फलटण: तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण टुडे वृत्तसेवा दि १८ ऑक्टोबर २०२६): – तालुका क्रीडा संकुल, जाधववाडी येथे दिनांक ६ आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चमकदार आणि उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत मुधोजीच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकावत आपली क्रीडा परंपरा कायम राखली आहे.


स्पर्धेत चौदा वर्षाखालील वयोगटात स्वरा मुकुंद गायकवाड हिने चारशे मीटर धावणे आणि सहाशे मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात ऋग्वेद फडतरे याने एकशे दहा मीटर हर्डलमध्ये प्रथम क्रमांक, तर ध्रुव लोंढे याने द्वितीय क्रमांक मिळवला. उंच उडीत यश गावडे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर तिहेरी उडीत सुरंजन नाळे याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच मुलांच्या चार गुणिले चारशे मीटर रिले संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. एकोणीस वर्षाखालील गटात श्रद्धा चव्हाण हिने आठशे मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. शंभर मीटर धावणे प्रकारात साक्षी चव्हाण हिने द्वितीय, तर विद्या गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. दोनशे मीटर धावणे प्रकारात राजनंदिनी डूबल हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच संचित गायकवाड याने चारशे मीटर धावणे आणि चारशे मीटर हर्डल या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.


विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननावरे, पर्यवेक्षक श्री. विजय पाटील आणि सौ. पूजा पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशामागे मेहनत घेणारे मार्गदर्शक व प्रशिक्षक श्री. मोहिते सर, श्री. सावंत सर, श्री. मंगेश नेरकर आणि सौ. गावडे मॅडम यांचेही विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या आणि मार्गदर्शकांच्या या उज्ज्वल यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंत शेडगे, उपप्राचार्य आण्णासाहेब ननावरे आणि सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील, सौ. पूजा पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!