*फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ३५ लाख रुपये मंजूर : आ.दिपकराव चव्हाण*

 

 फलटण टुडे वृत्तसेवा : –

 फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दि.२६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार २ कोटी ३५ लाख रुपये उपलब्ध झाल्याची माहिती आ.दिपकराव चव्हाण यांनी दिली आहे.
       राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दि.२६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार ३५० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यापैकी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागासाठी १ कोटी ३५ लाख आणि फलटण शहरासाठी १ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
   आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ.दिपकराव चव्हाण यांनी सुचविलेल्या कामांसाठी सदर निधी उपलब्ध झाला आहे.
   फलटण शहरात शुक्रवार पेठ (चावडी चौक) येथे सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख रुपये, फलटण शहरात नगर परिषद हद्दीतील स्टोअरेज टॅंक शेजारी दफनभूमीत सोयीसुविधांसाठी २५ लाख रुपये आणि फलटण शहरातील मुस्लिम दफनभुमीमध्ये अंतर्गत सुधारणा करणे २५ लाख असे नागरी भागासाठी (फलटण शहर) १ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत.
      जावली, आसू, तिरकवाडी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे साठी प्रत्येकी १० लाख रुपये, तरडगाव येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे साठी २० लाख रुपये, होळ येथील कब्रस्तान बैठक व्यवस्था करणेसाठी ९ लाख, मिरगाव कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे ९ लाख रुपये, आदर्की बु|| येथे मस्जिदजवळ पेव्हर ब्लॉक टाकणे ८ लाख रुपये, सरडे दफनभूमी सुशोभीकरण करणे १० लाख रुपये, वाठार स्टेशन येथे कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे १४ लाख रुपये, वाघोली येथे कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे १५ लाख रुपये, मौजे जाधववाडी (फ) येथे मस्जिद परिसरात सभागृह बांधणे १० लाख रुपये आणि मौजे बरड येथे दफनभूमी परिसरात सुशोभीकरण करणे १० लाख रुपये असे ग्रामीण भागासाठी एकूण १ कोटी ३५ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.
    मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वरीलप्रमाणे २ कोटी ३५ लाख रुपये उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देत त्यांचे या समाजाच्यावतीने व व्यक्तिगत आभार मानत असल्याचे आ.दिपकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!