फलटण टुडे(सोमेश्वरनगर ता. बारामती) : –
शनिवार, दि. ११ फेब्रुवारी२०२३आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील ग्रामपंचायत सदस्यांसाठी “ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.०० वा. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. अभिजीतभैय्या काकडे-देशमुख यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री. मार्तंड देवस्थान, जेजुरी न्यासाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयातील आर्थिक दुर्बल व कोरोना काळात निराधार झालेल्या 22 विद्यार्थिनींना 57 हजार रुपयांची आर्थिक मदत केली गेली. या आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अभिजीतभैय्या काकडे-देशमुख व उपस्थित सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. पोपट जाधव यांनी केले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व प्रमुख अतिथि तथा मार्गदर्शक म्हणून निरा ग्रामपंचयातचे उपसरपंच श्री. राजेशभाऊ काकडे आणि वाघळवाडी ग्रामपंचयातचे सरपंच अॅड. श्री. हेमंत गायकवाड उपस्थित होते. गाव हा देशाचा केंद्रबिंदू मानला जातो आणि गावाच्या प्रशासन व्यवस्थेची जबाबदारी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची असते. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विद्यापीठाच्या सहकार्याने महाविद्यालय अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करीत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी आपल्या प्राचार्य मनोगतामध्ये व्यक्त केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये वाघळवाडी ग्रामपंचयातचे सरपंच अॅड. श्री. हेमंत गायकवाड यांनी “ग्रामपंचायत अधिनियम आणि त्यातील तरतुदी” या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिनियमात असलेल्या तरतुदीनुसार ग्रामसभा घेतल्या तर आदर्श ग्रामसभा होऊ शकतील. परंतु ग्रामस्थ ग्रामसभेकडे पाठ फिरवतात ही शोकांतिका असून गाव विकासासाठी एकत्र येण गरजेचे आहे. तसेच त्यांनी मासिक सभा त्यात असलेले नियम, ग्रामविकास समित्या यांचीही माहिती दिली. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये निरा ग्रामपंचयातचे उपसरपंच श्री. राजेशभाऊ काकडे यांनी “ग्रामपंचायत आणि राबविल्या जाणाऱ्या विविध योजना” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपले अनुभव सांगताना ते पुढे म्हणाले की, योजनांना गरजेनुसार प्राधान्यक्रम द्यावा. योजना राबवताना स्थानिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे, त्यामुळे ती योजना लोकांना आपली वाटेल व तिला विरोध राहणार नाही. बर्याच योजना नाहक विरोधापोटी अपूर्ण राहतात. म्हणून राजकरणामध्ये मतभेद असावेत, मनभेद नसावेत. सर्वांना बरोबर घेऊन सरपंचाने ग्रामपंचायतीचे कामकाज करावे.
कार्यशाळेत परिसरातील वाघळवाडी, गरदरवाडी, निरा, मुरूम, वाणेवाडी, निंबूत, करंजे, करंजेपुल, होळ, सदोबाचीवाडी इ. ग्रामपंचायतींचे ५५ सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने श्री. वैभव गायकवाड (सरपंच, करंजेपुल), सौ. गीतांजली जगताप (सरपंच, वाणेवाडी) व श्री. तुषार सकुंडे (सदस्य, वाघळवाडी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रविण ताटे-देशमुख, प्रा. आर. एस जगताप, प्रा. मेघा जगताप, आर. डी. गायकवाड, डॉ. संजू जाधव, डॉ. जवाहर चौधरी, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. निलेश आढाव, प्रा.आदिनाथ लोंढे, डॉ. राहुल खरात, किरण मोरे, प्रा. कुलदीप वाघमारे, प्रा.चेतना तावरे, प्रा. प्रियंका तांबे, प्रा. रोहित बोत्रे, अमोल काकडे, आगाम सर, निखिल जगताप तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळा यशस्वी केली. तसेच महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुजाता भोईटे, सहसचिव श्री. सतीश लकडे, श्री. नंदुभैय्या शिंगटे (सरपंच, मुरूम), सौ. मालनताई गरदरे (सरपंच, गरदरवाडी) इ. मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले तर उद्घाटन सत्राचे आभार डॉ. नारायण राजुरवार व संपूर्ण कार्यक्रमाचे आभार डॉ. दत्तात्रय डुबल यांनी मानले.