इयत्ता १० वी (एस.एस. सी. )बोर्ड परीक्षा फलटण तालुक्याचा निकाल ९२.४४ टक्के

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०८ मे २०२६):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, यामध्ये फलटण तालुक्याने ९२.४४ टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. आज दुपारी निकाल ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

फलटण तालुक्यातून या परीक्षेसाठी एकूण ४ हजार ०८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, ज्यामध्ये २ हजार ०७६ मुले आणि १ हजार ९३२ मुलींचा समावेश होता. यापैकी ३ हजार ९९६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती. जाहीर झालेल्या निकालानुसार, एकूण ३ हजार ६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लिंगनिहाय निकालाचा विचार करता, परीक्षेला बसलेल्या २ हजार ०६९ मुलांपैकी १ हजार ८६४ मुले उत्तीर्ण झाली आहेत, तर १ हजार ९२७ मुलींपैकी १ हजार ८३० मुलींनी परीक्षेत यश मिळवले आहे.

एकूण निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सरस असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी आपला दर्जा टिकवून धरल्याचे या निकालावरून स्पष्ट होत असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. माध्यमिक शिक्षण विभागाने आणि तालुक्यातील शिक्षक वृंदाने विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!