मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा २०२६ पुरुष व महिला गटाचा दुहेरी मुकुट

शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीलातर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेला महापौर चषक

फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई ३१ मे २०२६):- : मुंबई खो-खो संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान, दादर (प.) येथे सुरू असलेल्या मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धा – २०२६ मध्ये पुरुष व महिला गटाचा दुहेरी मुकुट मिळवताना उपनगरच्या शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने पुरुषांमध्ये श्री समर्थ व्या. मंदिरला व महिलांमध्ये सरस्वती कन्या या दोन्ही मुंबईच्या संघांना तर व्यावसायिक गटात सेंट्रल रेल्वेने मुंबई पोलिसांना पराभूत करत मुंबई महापौर चषकावर नाव कोरले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ यशवंत किल्लेदार (नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष) यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ॲड. अरुण देशमुख, बाळासाहेब (बाळ) तोरसकर, सुरेंद्र विश्वकर्मा, नरेंद्र कुंदर, पांडुरंग परब, डलेश देसाई, श्रीकांत गायकवाड, पराग आंबेकर, रुपेश शेलटर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी शिवाजी पार्क परिसरातील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा ११-९ (मध्यंतर ११-५) असा १ डाव व २ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या रामचंद्र झोरे (२.२०, २.३० मि. संरक्षण व १ गुण), धीरज भावे (२, २.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रतिक देवरे (२ मि. संरक्षण), ऋषिकेश मूर्चावडे (१.४० मि. संरक्षण), निहार दुबळे (५ गुण) व यांनी मुंबई महापौर चषकावर नाव कोरले. तर पराभूत श्री समर्थच्या पियुष घोलम (२ मि. संरक्षण), हितेश आंग्रे (१.४० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाके (१.१० मि. संरक्षण) व ओम भरणकर (४ गुण) यांनी पराभवातही चांगली कामगिरी केली.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात सुध्दा शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पो. अॅकॅडमीने सरस्वती कन्या संघावर १०-३ (मध्यंतर १०-१) असा १ डाव व ७ गुणांनी धामाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या साक्षी वाफेलकर (६.४० मि. संरक्षण व २ गुण), देविका अहिरे (नाबाद २.२०, ४.४० मि. संरक्षण व १ गुण), सृष्टी पाष्टे (३ मि. संरक्षण) साक्षी पारसेकर व मनाली दुपारगुडे (प्रत्येकी २ गुण) यांनी मुंबई महापौर चषकावर कब्जा केला तर पराभूत सरस्वतीच्या सेजल यादव (२.१०, २.५० मि. संरक्षण), काजल दिवेकर (१.१० मि. संरक्षण) खुशबू सुतार (नाबाद १.१० मि. संरक्षण) व वैदवी बटवळ (२ गुण) यांनी दिलेली लढत विजय मिळवून देऊ शकली नाही.

व्यवसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने मुंबई पोलीसांचा १३-११ (मध्यंतर १३-५) असा एक डाव राखून २ गुणांनी मोठा पराभव केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या शुभम थोरात (२.१०, १.४० मि. संरक्षण), अर्णव पाटणकर (२ मि. संरक्षण व १ गुण), अवधूत पाटील (२ मि. संरक्षण व १ गुण), रामजी कश्यप (नाबाद १, १ मि. संरक्षण व ३ गुण), दिलीप खांडवी (१.१०, २.४० मि. संरक्षण व २ गुण), व आकाश कदम (३ गुण) यांनी संघाला मुंबई पहापौर चषक मिळवून दिला. तर पराभूत मुंबई पोलीसांच्या सुजित पालव (१.१०, १ मि. संरक्षण), स्वप्निल सावंत (१.१० मि. संरक्षण), अक्षय खापरे (४ गुण), निखिल घाडगे (३ गुण) यांनी दिलेली लढत विशेष नोंद करून गेली.

पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा (९-५) असा ४ गुणांनी पराभव केला. महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात श्री सह्याद्री या संघाने अ.भी गोरेगावकरवर चुरशीच्या सामन्यात ६-६ असा लघुत्तम आक्रमणात ११.३१ सेकंदाने विजय मिळवला. तर व्यवसायिक गटाच्या तृतीय क्रमांकाच्या चुरशीच्या सामन्यात महावितरण कंपनीने स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा लघुत्तम आक्रमणात (८-८) असा १.१४.०३ मि. राखून पराभव केला.

Screenshot

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : (पुरुष गट, महिला गट व व्यावसायिक गट)
उत्कृष्ट संरक्षक – पियुष घोलम (श्री समर्थ), सेजल यादव (सरस्वती कन्या), शुभम थोरात (मध्य रेल्वे)

उत्कृष्ट आक्रमक – निहार दुबळे (महात्मा गांधी), साक्षी वाफेलकर (महात्मा गांधी), अक्षय खापरे (मुंबई पोलीस)

अष्टपैलू खेळाडू : धीरज भावे (महात्मा गांधी), देविका अहिरे (महात्मा गांधी), दिलीप खांडवी ( मध्य रेल्वे)

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!