स्पर्धेतील सुवर्णपदक व प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारताना संघातील सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक,व्यवस्थापक व इतर मान्यवर..
फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर , दि ३१ ऑक्टोबर २०२६): –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा पार पडल्या. दिनांक २६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अशा आठही विभागांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने नेत्रदीपक व ऐतिहासिक कामगिरी करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आणि पहिल्यांदाच सुवर्णपदकास गवसणी घातली.

स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात मुधोजीच्या मुलींनी पुणे विभागाचा ३-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात निकिता वेताळ, सिद्धी केंजळे व अनुष्का केंजळे यांनी गोल नोंदवले. यानंतर उपांत्य सामन्यात मुधोजीच्या संघाने नाशिक विभागाचा १२-० अशा दणदणीत गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात श्रुतिका घाडगे, केतकी बोले, दुर्वा साळुंखे, सिद्धी केंजळे, निकिता वेताळ, श्रेया चव्हाण आणि अनुष्का चव्हाण यांनी गोल झळकावले. तर अंतिम सामन्यात अमरावती विभागाचा ९-० असा धुव्वा उडवत मुधोजी संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

या अंतिम लढतीत निकिता वेताळ, सिद्धी केंजळे, श्रुतिका घाडगे, धनलक्ष्मी शेडगे, गौरी महामुलकर, अनुष्का केंजळे आणि श्रेया चव्हाण यांनी गोल नोंदवले.
या विजयी संघात तेजस्विनी कर्वे, श्रावणी जाधव, श्रावणी ननावरे, नंदिनी शिंदे, वेदिका सोनवणे व सुप्रिया जाधव यांनी बचाव फळीत उत्कृष्ट कामगिरी केली. गोलकीपर अनुष्का चव्हाण हिने संपूर्ण स्पर्धेत अभेद्य गोलरक्षण करत विरोधी संघाला एकही गोल करू दिला नाही. संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल न नोंदवू देणे ही या संघाची सर्वात उल्लेखनीय बाब ठरली. मुधोजी हायस्कूलने यापूर्वी १४ वर्षाखालील वयोगटात सलग ५ वर्षे सुवर्णपदक, तर १७ वर्षाखालील गटात सलग ३ वर्षे सुवर्ण व रौप्य पदके पटकावली असून, १९ वर्षाखालील गटात सुवर्णपदक पटकावण्याची ही पहिलीच ऐतिहासिक वेळ आहे. या संघात दिल्ली येथे झालेल्या नेहरू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे.

या यशस्वी संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ व संघ व्यवस्थापक धनश्री क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच फिटनेस ट्रेनर ऋषिकेश पवार, विनय नेरकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक बी. बी. खुरंगे व सुजित निंबाळकर यांचे सहकार्य मिळाले. या ऐतिहासिक यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य वसंतराव शेडगे, उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, सोमनाथ माने, पर्यवेक्षक विजय लोंढे, पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे आणि द हॉकी सातारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.


