इन्स्टाग्रामवर बनावट आयडीद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्या दोघांना फलटण शहर पोलिसांनी केली अटक

1) प्रमोद सनद कांबळे. 2) सुनील बाळू मोहिते

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. ६ जून २०२६):-
सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेविषयी आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हिडिओ व संदेश प्रसारित करून बदनामी करणाऱ्या आरोपींना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड घेऊन बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केल्याचे निष्पन्न झाले. या खात्याद्वारे महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व अश्लील संदेश फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी करण्यात येत होती.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रमोद सनद कांबळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) व सुनील बाळू मोहिते (वय ३४, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण) यांना ताब्यात घेतले. तपासात सुनील मोहिते हा एका टेलिकॉम कंपनीचा सिमकार्ड विक्रेता असल्याचे व त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड उपलब्ध करून दिल्याचे समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी ४ मोबाईल हँडसेट, ६ सिमकार्ड आणि सुमारे २३,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे व त्यांच्या पथकाने केली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!