फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १९ जुलै २०२६):- संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात साक्षरतेची जनजागृती करण्यासाठी शुक्रवार दि १७ जुलै २०२६ रोजी फलटण येथील जिंतीनाक येथे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार देशभरामध्ये उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते 2026-27 मध्ये राबवण्यात येत आहे.
राज्यामध्येही 15 वर्षे व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांना नवसाक्षर करण्याच्या उद्देशाने सदर योजना महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय(योजना)कार्यालय, पुणे व SCERT, पुणे यांचेमार्फत राबविली जात आहे.
सदर योजनेचा सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचार- प्रसार व्हावा या उद्देशाने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या तीन वर्षापासून साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी हया नाविण्यपूर्ण उपक्रमाची पंरपरा चालू आहे. डॉ .महेश पालकर व राजेश क्षीरसागर ( पूर्व शिक्षण संचालक, उपसंचालक योजना संचालनालय ) यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली व संभाजी देशमुख राज्य समन्वयक प्रचार प्रसार यांच्या संकल्पनेतून हा “वारी साक्षरतेचा उपक्रम” चालू झालेला आहे.
या उपक्रमांचा एक भाग म्हणून शिक्षण संचालनालय (योजना), कार्यालय, पुणे चे संचालक कृष्णकुमार पाटील व उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी पण पंरपरेप्रमाणे “वारी साक्षरतचा” हा एक महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. सदर उपक्रमांतर्गत पंढरीच्या वारीमधील असाक्षर वारकऱ्यांना साक्षरतेचे महत्व पटवून देणे, त्यांची नोंदणी करणे व उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा उद्देश पटवून देणे हा आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गावर स्वतंत्र साक्षरता रथाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर साक्षरता रथाचे फलटण येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मालोजीराजे कृषी विद्यालय, मालोजीराजे विद्यालय व वेणूताई चव्हाण हायस्कूल फलटण च्या विद्यार्थ्यांनी साक्षरता विषयक पथनाट्य सादर केले. तसेच टीम साक्षरता वारी यांच्या वतीने साक्षरता गीते सादर केली. यावेळी शिक्षण विभाग, पंचायत समिती फलटण येथील टीम व शिक्षण संचालनालय (योजना), कार्यालय, पुणे यांच्या टीमने साक्षरता गीते, ….या माध्यमातून असाक्षर वारकऱ्यांचे प्रबोधन केले. शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी “साक्षर वारकऱ्यांनी ही सदर मोहिमेत सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल सस्ते, नगरसेवक राहुल जाधव,जिल्हा परिषद सदस्य वैशाली कांबळे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, सहसंचालक अनिता कडू,उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ, लेखाधिकारी स्मिता राऊत,उपशिक्षणाधिकारी संप्रदा पानसरे, पंचायत समिती फलटणचे गटशिक्षणाधिकारी मठपती, बी आर सी विषयसाधक सौ दमयंती कुंभार, मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य बी डी काळे ,मनोज कदम,योजना कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक, उल्लास चे राज्य समन्वयक संभाजीराव देशमुख, स्वयंसेवक नागसेन साबळे, लव गायकवाड, अनंता पोकळे, राजेश गुंजाळ, सदाशिव साबळे, हर्षवर्धन,सर्व केंद्रप्रमुख, फलटण शहरातील सर्व हायस्कूल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, निवेदक डॉ. संजय भोसले व फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग सांस्कृतिक टीम आदि उपस्थित होते.

