विद्यार्थ्यांनाके अजितदादा चे विचार सांगताना व पुस्तकाचे महत्व सांगतांना प्रा मनोज वाबळे
फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती, दि ३० ऑगस्ट २०२६):-
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व: अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शब्दधन सोशल फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बारामती तालुक्यात राबविण्यात आलेला “कृतज्ञता दादांसाठी” हा सामाजिक, शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला.

समाजात कृतज्ञतेची भावना जागृत करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, सकारात्मक विचारांना चालना देणे आणि विकासाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमांतर्गत बारामती तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये, अकॅडमी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये २२ मोफत प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथालये आणि विविध संस्थांना मिळून २२०० प्रेरणादायी पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या संपूर्ण उपक्रमातील विशेष आकर्षण ठरलेला कार्यक्रम पंचायत समिती, बारामती येथील मा. अजितदादा पवार वाचनालयात पार पडला. यावेळी वाचनालयासाठी २०० पुस्तकांची भेट देण्यात आली. ज्ञान, वाचन आणि समाजसेवा या त्रिसूत्रीला बळ देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
या कार्यक्रमात मनोज शिवाजी वाबळे (प्रेरणादायी वक्ते, लेखक, करिअर मार्गदर्शक, कॉर्पोरेट ट्रेनर, अध्यक्ष – शब्दधन सोशल फाऊंडेशन यांनी “महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय अजितदादा पवार” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांच्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाला विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

व्याख्यानामध्ये त्यांनी अजितदादा पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणि कार्यशैलीतील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकला. “कामाचा माणूस”, “प्रचंड उत्साही नेता” अशी ओळख असलेल्या दादांच्या निर्णयक्षमता, विकासाभिमुख दृष्टीकोन, प्रशासकीय कार्यक्षमता, वेळेचे नियोजन, शिस्तप्रियता, लोकांशी थेट संवाद साधण्याची शैली, कष्टाळूपणा, दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व, संकट व्यवस्थापन, परिणामकेंद्रित कार्यपद्धती, शिक्षण व कृषी क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन आणि जनसंपर्क कौशल्य या गुणांचे विविध उदाहरणांसह सविस्तर विश्लेषण करण्यात आले.

‘कृतज्ञता दादांसाठी’ या व्याख्यानमालेअंतर्गत बारामती तालुक्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये सलग कार्यक्रम पार पडले. कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड कॉम्प्युटर एज्युकेशन (माळेगाव), विद्या प्रतिष्ठान (बीसीएस विभाग), देशमुख कॉमर्स अॅकॅडमी, जय हिंद अॅकॅडमी, अभिमन्यु सायन्स अॅकॅडमी, एक्सीड विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, स्वयंप्रेरणा, विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चर, न्यू इंग्लिश स्कूल (डोर्लेवाडी), न्यू इंग्लिश स्कूल (कारखेल), पंचायत समिती बारामती, अभिमन्यु फाऊंडेशन तसेच इतर विविध संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. वाचनाची सवय, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर नियोजन, सकारात्मक विचार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शब्दधन सोशल फाऊंडेशनच्या सचिव सौ. निलम मनोज वाबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.


