फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण,दि २९ ऑगस्ट २०२६):- श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलामध्ये २९ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय खेळ दिना’चे औचित्य साधून हॉकी, फुटबॉल, खो-खो व कबड्डी या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि ‘द हॉकी सातारा’ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडल्या.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर आणि ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू संजय फडतरे, बी. बी. खुरंगे व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तुषार मोहिते उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तुषार मोहिते यांनी प्रास्ताविक करून क्रीडा दिनाचे महत्त्व व स्पर्धांची माहिती दिली. या कार्यक्रमात राज्य पदक विजेत्या व राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

आपल्या मनोगतात महेश खुटाळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या खेळाविषयी माहिती देत, खेळातील शिस्त व सातत्याच्या जोरावर खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतात, असे सांगितले.
प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देत अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये खेळाची आवड निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

दिवसभरात १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात हॉकी, फुटबॉल, खो-खो आणि कबड्डीच्या अटीतटीचे सामने पार पडले. विजेत्या संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख सचिन धुमाळ, अमित काळे, बोडरे, श्रवण वाळकुंदे, अविनाश गंगतीरे, गावडे, मुलानी, तुषार मोहिते, धनश्री क्षीरसागर, ऋषी पवार व विनय नेरकर यांनी परिश्रम घेतले.
धनश्री क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


