इस्कॉन बारामतीचा श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न!

“नंद के घर आनंद भयो… जय कन्हैयालाल की!”*

फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती दि ०५ सप्टेंबर २०२६):-
श्रीकृष्णांशी नाते जोडणे हीच जन्माष्टमीची खरी साधना आहे’, असे भक्तीपूर्ण उद्गार श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीमान भज गौरांग प्रभुजी यांनी काढले.श्रीकृष्ण जन्मकथा व विविध लीलांच्या माध्यमातून भगवंत आणि जीव यांच्यातील शाश्वत नाते उलगडून सांगितले. वसुदेवांनी श्रीकृष्णाला हृदयाशी धारण करून मथुरेतून गोकुळात नेण्याच्या प्रसंगातून श्रद्धा व भक्तीने भगवंतांना हृदयात धारण केल्यास जीवनातील अडथळे आणि बंधने दूर होतात, असा संदेश त्यांनी दिला. तसेच काम, क्रोधादी विकारांवर मात करण्यासाठी श्रीकृष्णांचे चिंतन, नामस्मरण आणि भक्तिमार्गाचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Screenshot


भक्ती, अध्यात्म, संस्कृती आणि आनंदाचा अनुपम संगम घडविणारा तिथीनुसार आयोजित केलेला इस्कॉन बारामती श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि देखण्या वातावरणात संपन्न झाला. श्री श्री राधाकृष्णांच्या दिव्य सान्निध्यात हजारो भक्तांनी श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आध्यात्मिक आनंद अनुभवला. या मंगल सोहळ्यास“महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), बारामतीचे प्रादेशिक अधिकारी श्री. हनुमंत पाटील”. तसेच शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिला वहिनी पवार ,
सौ. आरती शेंडगे (गव्हाळे) या बारामती नगरपरिषदेच्या नगरसेविका आणि विरोधी पक्ष नेत्या यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
तब्बल १६० भोग तसेच ३० मान्यवरांनी कलश अभिषेक करून भक्तिभावाने सेवा अर्पण केली.

Screenshot

कार्यक्रमाची सुरुवात भक्तिरसाने ओथंबलेल्या भजन व कीर्तनाने झाली. सुमधुर स्वरांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. श्रीमान भज गौरांग प्रभूजी यांनी आपल्या रसाळ आणि श्रवणीय शैलीत सादर केलेली श्रीकृष्ण कथा हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.

यानंतर श्री श्री राधाकृष्णांचा अभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद अशा मंगलमय वातावरणात जन्माष्टमी सोहळ्याची सांगता झाली.

मंदिरातील श्री श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्रा महाराणी यांच्या विग्रहांचे तसेच संपूर्ण मंदिर परिसराचे करण्यात आलेले आकर्षक सुशोभीकरण विशेष लक्षवेधी ठरले. रोषणाई, सजावट ,
आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यात रंग भरले, तर विविध उपयुक्त स्टॉल्सच्या माध्यमातून बारामतीतील युवक, महिला आणि बालगोपालांना आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांना जप करण्याची संधी देण्यात आल्याने अनेकांनी भक्तिमार्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

अत्यंत सुयोग्य, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे संपूर्ण जन्माष्टमी महामहोत्सव संस्मरणीय ठरला. सेवाभावी भक्तांची तत्परता, स्वयंसेवकांचे नियोजन आणि प्रत्येक घटकाकडे दिलेले बारकाईचे लक्ष यामुळे हजारो भाविकांनी कोणत्याही अडचणीशिवाय उत्सवाचा आनंद घेतला.
इस्कॉन बारामतीच्या वतीने येत्या १२ सप्टेंबर रोजी कृष्णाई लॉन्स येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आले असून “इस्कॉनचे ज्येष्ठ आध्यात्मिक मार्गदर्शक व गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक श्रीमान गौरांग दास प्रभुजी” यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.श्रीकृष्णप्रेम, भक्ती, ज्ञान आणि आनंदाचा हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी बारामतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमान नंद दुलाल प्रभुजी, व्यवस्थापक, इस्कॉन बारामती मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!