श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषी महाविद्यालय फलटण मध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ५ सप्टेंबर २०२६):-भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय मध्ये 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थ्यांनी मिळून केले होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे कु. शिवांजली डोंबाळे, कु. रोशनी देवरे, कु. तृप्ति घाटे, कु. मृणाल गिरमे यांनी केली व प्रा. डी. ए. कुलाळ यांनी मनोगत व्यक्त करताना 'शिक्षक' आणि 'गुरू' या दोन शब्दांमधील अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे आपण शिक्षक आणि गुरू हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण त्यांच्यात एक मोठा फरक आहे. शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञान देतात, विषयाची ओळख करून देतात, अक्षरांची आणि अंकांची ओळख करून देतात. ते आपल्याला परीक्षेसाठी आणि करिअरसाठी तयार करतात, दुसरीकडे, गुरू हे ज्ञानाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवतात. गुरु म्हणजे जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तो गुरू असतो. शिक्षक आपल्याला बुद्धिमान बनवतात, तर गुरू आपल्याला विवेकी बनवतात. शिक्षक वर्गात परीक्षा घेऊन गुण देतात, तर गुरू आयुष्यातील प्रत्येक संकटाशी कसे लढायचे याचे आत्मबळ देतात. आजच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील अशा सर्व शिक्षक आणि गुरूंना वंदन केले पाहिजे."
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यामध्ये शिस्त, संस्कार, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करावी, असे प्रतिपादन केले.

तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखून त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करावा. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, शिस्तप्रिय, मेहनती व जबाबदार बनून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, परस्पर आदर व विश्वास यामुळेच शैक्षणिक वातावरण अधिक प्रभावी होते, असे सांगत प्राचार्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून वागावे, तर विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे, असे मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी आपल्या मनोगतात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा व विचारांचा गौरवपूर्ण उल्लेख करून शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्यांनी सांगितले की, शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी ज्ञानासोबतच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे.
आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःमध्येही सातत्याने नवनवीन ज्ञान व कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार व मूल्ये अंगीकारावीत, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, विश्वास आणि परस्पर आदर हेच उत्तम शैक्षणिक वातावरणाचे आधारस्तंभ आहेत, असे प्राचार्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून कुटुंब, संस्था आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार कुमारी मृणाल घनवट व कुमारी धनश्री नाणेकर यांनी केले.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!