फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि.23 सप्टेंबर २०२६):- जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षणाला चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांर्भीयाने घेत या प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे प्रशिक्षणादरम्यान प्रक्रियेची अचूक माहिती समजून घेतल्यास पुढील टप्प्यातील कामकाजात अडचणी येणार नाहीत आणि जनगणनेचे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल, असे प्रतिपादन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जनगणना कार्य संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक तेजल कटारे, ए. डी. सी. ओ. तुषार पाटील, विशेष कार्यकारी दंडाधिकारी वैभव पिलारे, सर्व चार्ज अधिकारी तथा तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, जनगणना कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील म्हणाले, जनगणनेच्या पहिल्या टप्यातील घरांची यादी व घरगणना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेस सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पूर्वतयारी म्हणून इन्युमरेशन ब्लॉकची निर्मिती व संक्षिप्त गृहसूची तयार करण्याच्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील टण्यातील अनुभव लक्षात घेता, पुढील टप्यातही सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात अग्रस्थानी यावे, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


