फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण, दि २९ सप्टेंबर २०२६):-फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब घडली आहे. श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमीचे हेड कोच व उत्कृष्ट क्रिकेटपटू सोमनाथ चौधरी यांची अवघ्या दोन दिवसांत क्रिकेट क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. नुकतीच त्यांची सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या (SDCA) सिलेक्टरपदी निवड झाली होती, त्यानंतर लगेचच त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) टूर्नामेंट कमिटी मेंबरपदी निवड करण्यात आली आहे.

एकाच वेळी जिल्हास्तरीय निवड समितीची आणि राज्यस्तरीय टूर्नामेंट कमिटीची जबाबदारी मिळाल्याने हा ‘दुग्धशर्करा योग’ साधला गेला आहे. सलग झालेल्या या दोन मोठ्या निवडींमुळे सोमनाथ चौधरी यांच्या प्रदीर्घ अनुभवाची आणि क्रिकेट क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली गेल्याचे सिद्ध होत असून, फलटणच्या क्रिकेट क्षेत्रासाठी हा मानाचा क्षण ठरला आहे.

श्रीमंत रामराजे क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून सोमनाथ चौधरी यांनी युवा खेळाडूंना तांत्रिक कौशल्यासह शिस्त, मेहनत आणि सातत्याचे धडे दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशराज (साहिल) मदने, निंबराज निंबाळकर, सुजन बिचुकले, अर्णव ससाने या खेळाडूंनी MCA च्या १४ व १६ वर्षांखालील कॅम्पमध्ये स्थान मिळवले, तर श्रावण खाडे या खेळाडूने थेट महाराष्ट्र संघात धडक मारली आहे. ग्रामीण भागातून पुढे येत जिल्हा आणि राज्य पातळीवर महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची ही वाटचाल स्थानिक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.

त्यांच्या या दुहेरी निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय खेळाडू,तालुक्यातील क्रिकेटपटू,पालक, क्रीडाप्रेमी, चौधरवाडी ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


