शिवाजी विद्यापीठ विभागीय मैदानी स्पर्धा: मुधोजी महाविद्यालयाच्या खेळाडूंची शानदार कामगिरी; रिले प्रकारात दोन सुवर्ण व एक रजत पदक पटकावत उंचावला फलटणचा गौरव!

फलटण टुडे वृत्तसेवा (रहिमतपूर दि १७ ऑक्टोबर २०२६):-
सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ विभागीय मैदानी पुरुष व महिला स्पर्धेत मुधोजी महाविद्यालय, फलटणच्या खेळाडूंनी तुफान कामगिरी करत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धांमध्ये मुधोजीच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवत दोन सुवर्ण, एक रजत आणि एक कांस्य पदकाची कमाई केली आहे.


स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या लढतीत ४×४०० मीटर मिक्स रिले धावणे क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तसेच ४×४०० मीटर महिला रिले धावणे क्रीडा प्रकारातही उत्कृष्ट समन्वय साधत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. याशिवाय ४×४०० मीटर पुरुष रिले धावणे क्रीडा प्रकारात अतिशय चुरशीच्या लढतीत संघाने रजतपदक संपादन केले. वैयक्तिक स्पर्धेत गणेश काशीद याने २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट धाव घेत कांस्यपदक पटकावले.
या संपूर्ण स्पर्धांमध्ये गणेश काशीद, गणेश माने, शंभू माने, शंभूराज जगताप, सुरज शिंदे, आदित्य झिटे, ज्योती शिंदे, समीक्षा कदम, समृद्धी देवमाने, पूर्व खानविलकर, प्रियांका खुस्पे आणि प्राजक्ता घोरपडे या प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेऊन आपल्या अप्रतिम खेळाच्या प्रदर्शनाने उपस्थितांची व प्रेक्षकांची मने जिंकली.


मुधोजी महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या या ऐतिहासिक व गौरवशाली यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी तथा प्राचार्य अरविंद निकम सर आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!