मुधोजीच्या रणरागिणींची ऐतिहासिक कामगिरी; राज्यस्तरीय हॉकीत पुण्याला नमवून सलग पाचव्यांदा जिंकले सुवर्णपदक

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलच्या मुलींचा सलग पाचव्यांदा सुवर्णपदकावर कब्जा

सलग पाचव्या वर्षी शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा मुधोजी हायस्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा हॉकी संघ

फलटण टुडे वृत्तसेवा (बुलढाणा, दि. १९ नोव्हेंबर २०२६): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत सलग पाचव्या वर्षी सुवर्णपदक पटकावले आहे. बुलढाणा येथील सहकार विद्यामंदिर हॉकी मैदानावर दिनांक १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठही विभागांचे संघ सहभागी झाले होते.


स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात मुधोजीच्या संघाने नागपूर विभागाचा ३-० अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर झालेल्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य सामन्यात मुंबई विभागावर १-० असा निसटता विजय मिळवत संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुणे विभागाविरुद्ध खेळताना मुधोजीच्या मुलींनी २-१ अशा गोलफरकाने बाजी मारत स्पर्धेचे विजेतेपद व सुवर्णपदक निश्चित केले.

संपूर्ण स्पर्धेत कुमारी वैभवी राहिगुडे हिने प्रत्येक सामन्यात निर्णायक गोल नोंदवत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आघाडी फळीत कुमारी स्वरा वाघ, स्वरा चव्हाण, ईश्वरी फुले आणि स्वरांजली बोके यांनी उल्लेखनीय खेळ केला. बचाव फळीत कुमारी आरोही नवले, नेहा कुंभार, सोनाक्षी सोनवणे, आराध्या सोनवणे आणि ईश्वरी शिरतोडे यांनी भक्कम कामगिरी बजावली, तर गोलकीपर कुमारी राजवर्धिनी शिंदे हिने प्रतिस्पर्ध्यांचे हल्ले यशस्वीपणे परतवून लावले. याशिवाय कु. आराध्या तानवडे, अनया गायकवाड, सानिका गायकवाड, आराध्या ननावरे, आराध्या निंबाळकर आणि सबा सय्यद यांनीही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

या सुवर्णयशी संघाला ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री. महेश खुटाळे, मुधोजी हायस्कूलचे हॉकी प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ आणि संघ व्यवस्थापक कु. धनश्री क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. फिजिकल फिटनेस ट्रेनर म्हणून ऋषिकेश पवार व विनय नेरकर यांनी, तर निवृत्त क्रीडा शिक्षक श्री. बी. बी. खुरंगे आणि ज्येष्ठ हॉकी खेळाडू श्री. सुजित निंबाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

विजयी खेळाडू आणि मार्गदर्शकांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार श्री. दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समिती सदस्य, फलटण एज्यूकेशन सोसायटी च्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री. आर. बी. निंबाळकर, श्री. विजय लोंढे पाटील, सौ. पूजा पाटील, स्कूल कमिटीचे पदाधिकारी, द हॉकी सातारा संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच फलटणमधील ज्येष्ठ खेळाडूंनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!