फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड दि २१ नोव्हेंबर २०२६) :-
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रांतिसूर्य व आदिवासींचे जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे प्राचार्य श्री. टेंबरे सर यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माने सर यांनी केले, ज्यात त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.

यानंतर श्री. वळवी सर यांनी आपले प्रभावी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू येथे जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षापर्यंत ब्रिटिश साम्राज्याविरोधात मोठा लढा उभारला. आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी ‘उलगुलान’ (महान उठाव) पुकारला. त्यांच्या या अतुलनीय त्यागामुळे आणि समाजसुधारणेच्या कार्यामुळेच जनता त्यांना ‘धरती आबा’ (पृथ्वीचे पिता) म्हणून ओळखते, असे प्रतिपादन श्री. वळवी सर यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. देशमुख सर यांनी मानले. या जयंती सोहळ्याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

