एसजीएफआय राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मुधोजीच्या वेदांत मोहिते याने पटकावले रौप्यपदक; क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव


फलटण टुडे वृत्तसेवा (वर्धा, दि. २० नोव्हेंबर २०२६): वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या एसजीएफआय (SGFI) राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण या विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत मोहिते याने नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. वेदांत हा फलटण येथील चॅम्पियन्स कराटे क्लबमध्ये नियमित सराव करतो.


अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत वेदांतने उत्कृष्ट कौशल्य, संयम आणि जिद्दीचे दर्शन घडवत रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली. या यशामागे त्याला चॅम्पियन्स कराटे क्लबचे संस्थापक शिहान संतोष मोहिते तसेच प्रशिक्षक सेन्सेई सूरज ढेंबरे ,सेन्सेई प्रिया शेडगे आणि क्रीडा प्रशिक्षक तुषार मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

वेदांतच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक प्रशिक्षकांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार श्री. दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, क्रीडा समिती सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, उपप्राचार्य श्री. ए. वाय. ननावरे, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री. सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री. विजय लोंढे पाटील, सौ. पूजा पाटील, स्कूल कमिटीचे पदाधिकारी आणि फलटणमधील कराटे क्लबच्या ज्येष्ठ खेळाडूंनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!