फलटण टुडे वृत्तसेवा ( सातारा , दि. २३ नोव्हेंबर २०२६): ‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याच्या शौर्यशाली लष्करी परंपरेच्या स्मरणार्थ सातारा जिल्ह्याच्या पर्यटन संवर्धनासाठी व लष्करी वारशाचा सन्मान करण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा एअर शो व ‘एअर वॉरियर ड्रिल टीम’चे सादरीकरण गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी साताऱ्यात होणार आहे. २६/११ रोजीच्या मुंबई हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्याच्या स्मरणदिनीच हा कार्यक्रम आयोजित होत आहे.

महाराष्ट्रातील हा पहिलाच एअर शो देशातील पहिल्या सैनिक स्कूलच्या, म्हणजेच सैनिक स्कूल, सातारा येथील फुटबॉल मैदानावर दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते १ वा. होणार असून, श्रीमंत छत्रपती शाहू स्टेडियम येथे सायं ५ ते ७ या वेळेत वायुदलाचे बँड पथक व सैन्य दलाचे संचलन होईल. यातून विद्यार्थी व युवकांना वायुसेनेची शिस्त व कौशल्य अनुभवता येईल, संरक्षण दलातील करिअरसाठी प्रेरणा मिळेल आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल.
या कार्यक्रमास सर्व नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक व देशप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

