शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बारामतीचा नावलौकिक वाढवणारी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारी संस्था ठरेल : उपमुख्यमंत्री अजित पवारा

फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती दि २८ डिसेंबर २०२५):-विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक एआय सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. गौतमजी अदानी यांच्या हस्ते तसंच ज्येष्ठ नेते, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज आनंदात पार पडला.

१९७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण आणि कृषी क्षेत्राला बळ देण्यासाठी ‘कृषी विकास प्रतिष्ठान’ आणि ‘विद्या प्रतिष्ठान’ या संस्थांची स्थापना झाली. त्या काळी लिहिता-वाचता येणं म्हणजे साक्षरता समजली जायची; मात्र आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं (Al) शिक्षण घेतलेला विद्यार्थीच खऱ्या अर्थानं साक्षर मानला जाईल, अशी गरज निर्माण झाली आहे.

ही काळाची गरज ओळखून विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकारचे दर्जेदार शिक्षण देण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. आज विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक केंद्राच्या माध्यमातून त्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना नव्या युगातील संधी उपलब्ध करून देणारं हे केंद्र खऱ्या अर्थानं भविष्याची दारं उघडणारं आहे.

बारामतीच्या वैभवात भर घालणारी प्रत्येक गोष्ट करताना त्याचा लाभ तमाम बारामतीकरांना झाला पाहिजे, हीच आमची कायम भूमिका राहिली आहे. नव्या युगातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, AI, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा योग्य संगम घडवण्याचं काम आज देशभरात सुरू आहे. या प्रवाहात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी विद्या प्रतिष्ठाननं देशात एक ठोस आणि दिशादर्शक पाऊल उचललं आहे.

आज बारामतीत मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, शारदानगर, विद्या प्रतिष्ठान अशा विविध शैक्षणिक संकुलांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या उपलब्ध सुविधांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी बारामतीत शिक्षणासाठी येत आहेत. पुण्यानंतर ग्रामीण भागात बारामती हे एक शैक्षणिक हब म्हणून आकार घेत आहे.

याच वाटचालीत नर्सिंग कॉलेजला मंजुरी मिळाली असून इमारतीचा आराखडाही मंजूर करण्यात आला आहे. त्याच परिसरात भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा मानस आहे. बारामतीचा नावलौकिक वाढवणारी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारी ही वाटचाल अधिक वेगानं पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.असे कार्यक्रम प्रसंगी अजितदादा यांनी आपले विचार मांडले

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!