उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथे सामाजिक समता सप्ताह निमित्त व्याख्यान संपन्न

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासन आयोजित सामाजिक समता सप्ताह अंतर्गत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सामाजिक समता या विषयावर सविस्तर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. तसेच संविधान प्रास्ताविक वाचन, निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी फलटण संस्थानचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सहकार्य, शेतकरी समुदायासाठी मोलाचे योगदान, कोकणातील खोत पद्धती विरुद्ध लढा तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्यांची जाणीव ठेवून कार्य करावे असे विद्यार्थ्यांना अनुमोदन केले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून सौ. वैशाली कांबळे जिल्हा परिषद सदस्य तथा उपशिक्षिका, मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण ह्या उपस्थित होत्या. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांचा सखोल उहापोह केला. समाजातील जात, धर्म, लिंग, आर्थिक स्थिती यांमुळे निर्माण होणारी विषमता दूर करण्यासाठी शिक्षण, जागरूकता आणि संवेदनशीलता यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर न थांबता सामाजिक जबाबदारीही स्वीकारावी, समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक समता ही केवळ संकल्पना नसून ती आचरणात आणण्याची गरज आहे असे सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सामाजिक समतेचे महत्त्व स्पष्ट केले, महामानवाच्या नावाने उच्च शिक्षण घेण्यासाठी असणाऱ्या परदेशातील स्कॉलरशिपचा उपभोग घ्यावा, तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करून समताधिष्ठित समाज निर्माणासाठी योगदान द्यावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले असून प्रा. एस. पी. तरटे, कार्यक्रम अधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेबाबत जागरूकता निर्माण होऊन समताधिष्ठित समाज घडविण्यात यावा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कुमारी वृषाली गायकवाड व कुमारी भाग्यश्री वाघमारे व आभार प्रा. एस. पी. तरटे यांनी व्यक्त केले. 

(शब्द संकलन : डॉ. जी. बी. अडसूळ, कृषि विस्तार विभाग)

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!