मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पालखी पूजन करताना प्राचार्य वसंतराव शेडगे व इतर मान्यवर

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीराम मंदिर येथे वारकरी वेशातील विद्यार्थी, फुलांनी सजविलेली पालखी आणि भक्तिमय वातावरणाचे क्षण.
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि.१५ जुलै २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवार दिनांक १५ जुलै २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवत संपन्न झाला. या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी“मुधोजी हायस्कूल, फलटणच्या पवित्र प्रांगणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी, फुलांनी सजलेली पालखी, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माऊली’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दणाणून गेला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला भक्ती, समता, मानवता आणि ज्ञानाचा अमूल्य संदेश दिला. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे तर संस्कार, शिस्त आणि सामाजिक मूल्यांमध्येही समृद्ध व्हावे, या उद्देशाने शाळेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख होते, सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे सांस्कृतिक व मूल्याधिष्ठित उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

यावेळी ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य सोमनाथ माने व पर्यवेक्षक आर बी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य, वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती, समता, मानवता आणि सदाचार यांचे महत्त्व सांगितले . अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा वारसा जपत, ही भक्तीची परंपरा अशीच अखंड सुरू राहो.या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त आणि आपल्या समृद्ध वारकरी परंपरेचा अभिमान जागविण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
यावेळी वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली… तुकाराम!” या जयघोषात पालखीची मिरवणूक काढली. फुलांनी आकर्षक सजविलेल्या पालखीचे पूजन करून प्रशालेचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे , उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने, पर्यवेक्षक श्री रावसाहेब निंबाळकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी सौ अश्विनी भोसले यांनी सुंदर असे भक्तीगीत गायले व प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी पालखीचे विधिवत पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ केला आणि पालखी चे प्रस्थान झाले यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला प्रेम, समता, सेवा आणि भक्तीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक सुंदर प्रयत्न ठरला. हीच आपली संस्कृती… हीच आपली परंपरा… आणि हाच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा अमूल्य वारसा आहे असा संदेश बालचमूने दिला

तसेच यावेळी इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा करून या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या त्यांनी यावेळी हतामध्ये संदेशाचे फलक घेऊन वारीतून शिक्षणाचा संदेश , स्वच्छतेचा संदेश, व्यसन मुक्ती संदेश यावेळी दिला, तसेच टाळ , पताका ,फुगे विक्रेते फुल विक्रेते व नाम – बुक्का याची व्यक्तिरेखा विद्यार्थ्यानी वेशभूषा परिधान करून साकारली होती यामुळे बालचमू नीपालखी सोहळ्याची वातावरण निर्मिती केली तसेच विविध चौकातून जाताना महापुरुषाना अभिवादन करत चौकामध्ये फुगडी खेळण्याचा आनंद लुटला

प्रशालेतून पालखी सोहळा महावीर स्तंभ मार्गे मार्गस्थ झाला डेक्कन चौक – क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक- गजानन चौक – शंकर मार्केट मार्गे फलटण चे ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर येथे येऊन काही काळ विसावला
यावेळी प्रशालेतील इयत्ता सहावी क मध्ये शिकणाऱ्या संस्कार हनुमंत सोनवलकर या बाल कीर्तनकराने कीर्तन व भजन सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले व भक्तिमय वातावरणात निर्माण केले. यानंतर श्रीराम मंदिरातील आरती करून पालखी सोहळा पुढे जब्रेश्वर मंदिर मार्गे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौकातून प्रशालेत येऊन पालखी सोहळा विसावला.
चौकट:
यावेळी प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी यामध्ये प्रशालेतील इयत्ता पाचवीतील विठ्ठलरूपातील.. जयदीप मयूर गुंजवटे,संत तुकाराम महाराज रूपातील .. निलराज अभिजीत निंबाळकर तर इयत्ता सहवीतील रुक्मिणीरूपातील… स्वरांजली येवले आणि बालकीर्तनकार संस्कार हनुमंत सोनवलकर, प्रा सुधाकर वाकुडकर व प्रा अश्विनी भोसले यांनी गायलेले भजन व कीर्तन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पालखी सोहळ्याने शाळेचा परिसर भक्तिरसाने भारावून गेला आणि उपस्थितांनी “ज्ञानोबा माऊली… तुकाराम!” या नामगजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

