फलटण एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद; स्वायत्त दर्जामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण , दि ९ मे २०२६):-ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया अत्यंत उत्साहात सुरू झाली आहे. महाविद्यालयाने नुकताच प्राप्त केलेला ‘यूजीसी ऑटोनॉमस’ (स्वायत्त) दर्जा, ‘नॅक ए’ ग्रेड आणि ‘एनबीए’ मानांकन यामुळे या संस्थेची विश्वासार्हता वाढली असून, डिग्री व डिप्लोमाच्या विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांसह कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या कोर्सेससाठी प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल दिसून येत आहे.

केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हे महाविद्यालय नेहमीच अग्रभागी राहिले आहे. याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘इन्नोव्हेशन २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून तब्बल ७०४ संघांनी सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले होते. या अभूतपूर्व प्रतिसादाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. तांत्रिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘टेक बीट्स’ सारख्या सांस्कृतिक महोत्सवातून डान्स आणि फॅशन शो सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जात आहे.

महाविद्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील जागतिक स्तरावरील संधींचा व्यासपीठ. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘करिअर एक्स्पो’मध्ये १७ देशांतील विद्यापीठांचे प्रतिनिधी, विविध बँका आणि नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक सहाय्य आणि नोकरीच्या संधींची दारे खुली झाली आहेत. महाविद्यालयाने राबवलेल्या प्रभावी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मुळे अनेक विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली असून, अनेक माजी विद्यार्थी आज नामांकित उद्योजक आणि शासकीय उच्च पदांवर कार्यरत आहेत.

महाविद्यालयाची ही उत्तरोत्तर होणारी प्रगती पाहून फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महाविद्यालय समितीचे चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर
यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महाविद्यालयात उपलब्ध असलेला उच्चविद्याविभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि अद्ययावत सोयीसुविधांचा लाभ घेत परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी
केले आहे. या यशामुळे हे महाविद्यालय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!