फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ मे २०२६):-राष्ट्रीय जनगणनेच्या कामावर असणाऱ्या एका ४५ वर्षीय शिक्षक प्रगणकाला कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथे घडली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, जखमी शिक्षकाला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता गंभीर बनला आहे.

सध्या फलटण तालुक्यात आगामी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी स्थानिक प्रशासकीय कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षक घरोघरी जाऊन डिजिटल पद्धतीने नागरिकांची माहिती गोळा करत आहेत. घाडगेवाडी येथे जनगणनेचे काम करत असताना अचानक एका कुत्र्याने या शिक्षकावर हल्ला चढवला आणि चावा घेतला. शिक्षकाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी शिक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

नियमित सेवेव्यतिरिक्त काम; सहकार्याची अपेक्षा: या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण फलटण तालुक्यातून प्रगणकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. जनगणना प्रगणक हे शिक्षक आपली दैनंदिन शैक्षणिक सेवा आणि नियमित कर्तव्य सांभाळून हे राष्ट्रीय काम करत आहेत. ऊन-पावसाची तमा न बाळगता घरोघरी जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी केवळ माहिती न देता, योग्य ते सहकार्य आणि सुरक्षा देणे देखील तितकेच गरजेचे बनले आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त: अशा घटना टाळण्यासाठी आता जनगणना प्रगणकांनीही गावोगावी फिरताना स्वतःची काळजी घेणे क्रमप्राप्त बनले आहे. नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांना बाजूला बांधून प्रगणकांचे काम सोपे करण्यासाठी हातभार लावला पाहिजे, अशा भावना या घटनेनंतर तालुक्यातून व्यक्त होत आहेत. प्रगणक केवळ शासकीय ड्युटी म्हणून नव्हे, तर देशाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत योगदान देत असल्याने समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.



