महाराष्ट्रात घराघरात जाऊन होणार तब्बल ९.६८ कोटी मतदारांच्या नोंदींची पडताळणी; निवडणूक आयोगाची विशेष मोहीम

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ मे २०२६):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ‘विशेष सखोल मतदार पुनरिक्षण’ (एसआयआर) मोहीम अत्यंत व्यापक पातळीवर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्याची मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि पूर्णपणे अद्ययावत करण्यासाठीच ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या विशेष मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान मतदारांना पूर्वमुद्रित (Pre-printed) फॉर्मद्वारे त्यांच्या माहितीची पडताळणी करून दिली जाईल. मतदाराचे नाव, पत्ता, फोटो किंवा इतर कोणत्याही तपशीलामध्ये बदल करायचा असल्यास, त्याची नोंद या अर्जाद्वारे करता येणार आहे. यासोबतच मतदार यादीतून दुबार नावे वगळण्यासाठी ‘अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लीकेट’ (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाईल. ज्या मतदारांच्या नोंदींचे सन २००२ ते २००४ मधील जुन्या मतदार याद्यांशी मॅपिंग उपलब्ध असेल, त्यांना या प्रक्रियेसाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नसल्याचेही यावेळी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Screenshot

असे असेल मोहिमेचे सविस्तर वेळापत्रक: मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या मोहिमेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, आगामी २० ते २९ जून २०२६ दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर, ३० जून ते २९ जुलै २०२६ या काळात बीएलओ घरटी भेट देऊन गणना अर्ज वाटप व संकलन करतील. या प्रक्रियेनंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्याची प्रारूप (Draft) मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत नागरिकांना आपल्या दावे व हरकती नोंदवता येतील. प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कायदेशीररित्या निकालात काढल्या जातील आणि त्यानंतर, आगामी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्याची अंतिम (Final) मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय कर्तव्याच्या मोहिमेमध्ये राज्यातील सुमारे १ लाख २५३ हजार बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) आणि विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट्स (बीएलए) प्रत्यक्ष सहभाग नोंदवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या वतीने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष, पारदर्शक आणि त्रुटीरहित पद्धतीने राबविली जाईल. या मोहिमेत तांत्रिक किंवा प्रशासकीय चुकीमुळे कोणत्याही पात्र आणि कायदेशीर मतदाराचे नाव अन्यायकारकरीत्या मतदार यादीतून वगळले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी यावेळी राज्यातील जनतेला दिली आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!