किल्ले प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी; साताऱ्यात मंत्र्यांचा सकल नाभिक समाजाकडून सत्कार

महाराष्ट्र नाभिक महामंडळ सातारा जिल्हाध्यक्ष दळवी सर व सर्व पदाधिकारी व नाभिक समाज बांधव

फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि ०७ जुलै २०२६):-

सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्यास राज्य शासनाने तत्त्वतः मंजुरी दिल्याने नाभिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून समाजाच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सातारा येथे सकल नाभिक समाज व महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सातारा जिल्हा यांच्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल दोन्ही मंत्र्यांचे आभार मानले. स्मारकाच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रतापगडासारख्या ऐतिहासिक स्थळी शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय हा समाजाच्या अस्मितेला बळ देणारा असून त्यांच्या शौर्याचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!