फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा, दि.१५ जुलै २०२६):— इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री यशस्वी (PM YASASVI) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
योजनेनुसार इयत्ता ९ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५ हजार रुपये, तर इयत्ता ११ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक १ लाख २५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या निधीतून शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, गणवेश आदी खर्च भागविता येणार आहेत. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार असून आर्थिक सहाय्याची रक्कम थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये प्रवेश घेतलेल्या OBC, EBC व DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत.
अर्ज प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर उपलब्ध असून, https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुजित बर्गे, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे.

