फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.17 जुलै 2026):- राजपथ परिसरातील ‘डंका’ (Fast Food Joint) येथे दि. १६ जुलै रोजी घडलेल्या घटनेबाबत काही प्रसारमाध्यमांतून चुकीचे व दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित होत आहे. याबाबतची खरी वस्तुस्थिती खुलासा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सांगितलेली वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे, नागेश पाटील हे दिनांक 16 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांचे मित्र श्री.अमर मोरे यांच्यासोबत राजपथ, नगरपालिका इमारती समोरील ‘डंका’ फास्ट फूड जॉईंट येथे अल्पोपहारासाठी गेले होते. त्यावेळी तेथे दुकानातील कर्मचारी आणि एका मद्यधुंद इसमामध्ये गंभीर वाद व मारामारी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी लोकांचा मोठा जमाव उपस्थित होता, मात्र सर्वजण केवळ बघ्याची भूमिका घेत होते. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सुरू असलेला हिंसक प्रकार थांबावा, याच उद्देशाने श्री. पाटील यांनी स्वतः पुढे होऊन मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. वाद सोडवत असताना संबंधित मद्यधुंद इसमाने व त्याच्या सहकाऱ्याने श्री. पाटील यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारा दरम्यान श्री. पाटील यांनी स्वतः तात्काळ पोलीस पोलीस निरीक्षक श्री. म्हेत्रे दूरध्वनीवरून माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील हिंसक प्रकार टळला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना कोणतीही गंभीर मारहाण झालेली नसून, केवळ वाद मिटवताना झालेली ती झटापट होती.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.

