विद्यार्थ्यांमध्ये रयत कल्चर रुजवणे काळाची गरज, दिनेश दाभाडे

फलटण टुडे वृत्तसेवा ( जिंती / फलटण दि २७ सप्टेंबर २०२६):-कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रमाने रयत शिक्षण संस्था उभी केली. उच्च समाजासाठी जसे शिक्षण होते तसे दलित,बहुजन, वंचित यांच्यासाठी शिक्षण असावे असा विचार मनात घेऊन रयत शिक्षण संस्थेचा पाया उभारला गेला. बाल वयातच कर्मवीर आण्णांच्या मनावर शिक्षणाची बीजे खोलवर रुजली होती. कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यप्रिय होते. त्यामुळेच त्यांनी समाज घडवायचा वसा हाती घेतला होता. रयत शिक्षण संस्था उभी करत असताना अनेक अडचणी आल्या त्यासाठी त्यांनी मुष्टीफंड तसेच स्वावलंबनातून शिक्षण घेऊन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला व तो प्रयत्न यशस्वी झाला. सौ लक्ष्मीबाई यांच्या अश्रूने रयत शिक्षण संस्था घडली. पाटील मास्तर म्हणून असणारी ओळख बदलली व ते सर्वांचे कर्मवीर झाले. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये रयत शिक्षण संस्थेची घोषणा केली गेली. एक छोटेसे रोपटे त्याचा आज महावटवृक्ष झालेला दिसतो. महात्मा गांधी यांनी जेव्हा सातारला भेट दिली तेव्हा ते म्हणाले होते,मी जे साबरमतीमध्ये करू शकलो नाही ते भाऊरावांनी साताऱ्यात करून दाखवले, अठरापगड जातीतील मुलांना एकत्र करून एक नवा प्रयोग करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रयत कल्चर रुजवणे काळाची गरज आहे असे रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती ता. फलटण येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेच्या कार्यक्रमात दिनेश दाभाडे प्रमुख पाहुणे व सहाय्यक विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्षस्थानी राजेंद्र दौलतराव रणवरे होते. व्यासपीठावर स्कूल कमिटीचे सदस्य प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, जगदेवराव रणवरे,सरपंच मंगल माने, उपसरपंच शरद रणवरे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विनायक रणवरे,सतीश रणवरे, महेंद्र शिंदे,मुख्याध्यापिका सौ जाधव एम.डी., समुपदेशक ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिनेश दाभाडे पुढे म्हणाले की श्री जितोबा विद्यालय जिंती हे पुढच्या वर्षी साठाव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विद्यालयाची इमारत स्वतःच्या जागेत बांधावी हा संकल्प हाती घ्यावा. कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिंती गावामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा यशस्वी वाटचाल करत आहे, यासाठी सर्वांच्या मदतीची व सहकार्याची अपेक्षा आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक अंकुश सोळंकी व सौ.अर्चना धायगुडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका सौ. जाधव एम.डी. यांनी मानले. यावेळी प्रकाश रणवरे, कु.शाहीन हन्नूरे, शर्वरी रणवरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली . वाचन संस्कृती वाढीसाठी ताराचंद्र आवळे यांनी पन्नास पुस्तके विद्यालयास भेट दिली. करिअर गायडन्स अंतर्गत करिअर कॉर्नर व रांगोळी प्रदर्शन याचे उद्घाटन करण्यात आले. कर्मवीर जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना रोख बक्षीसही देण्यात आले. शिक्षकांना ज्ञानयात्री गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रत्नराज रणवरे, प्रमोद रणवरे, दीपक रणवरे, विद्या जमदाडे, अमोल जाधव, जीवन देशमुख तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!