फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १४ ऑगस्ट २०२६):- : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथील सांस्कृतिक विभाग व शालेय स्पर्धा विभागाच्या वतीने इ. ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शेडगे व्ही. के. होते. गायन स्पर्धेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
संगीत हे मनाला प्रसन्नता देणारे तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त माध्यम आहे. गायनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, आत्मविश्वासाला आणि सादरीकरण कौशल्याला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार विविध कला क्षेत्रांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

भावगीत, भक्तिगीत आणि देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, देशप्रेम आणि सामाजिक मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजण्यास मदत होते. त्यामुळे अशा सांस्कृतिक उपक्रमांचे शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे स्थान आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेत सहभागी होणे हे केवळ बक्षीस मिळविण्यासाठी नसून आपली कला सादर करणे, अनुभव मिळविणे आणि आत्मविश्वास वाढविणे यासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील यश-अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे आणि सातत्याने आपल्या कलागुणांचा विकास करावा, असेही प्राचार्यांनी सांगितले.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाकडून करण्यात येत असून, विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्यांनी केले. यावेळी उपप्राचार्य श्री. माने एस. एस. तसेच पर्यवेक्षक श्री. निंबाळकर आर. बी. यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भावगीत, भक्तिगीत तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून आपल्या गायनकलेचे सुंदर दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गीतांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लोणकर व्ही. आर. यांनी केले. व कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनामध्ये श्री. ढावरे एम. डी. यांनी संयोजकांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमास विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक विभाग व शालेय स्पर्धा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

