फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण/ वैभव जगताप, दि ०५ सप्टेंबर २०२६):-
फलटण, दि. ४ सप्टेंबर – गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा उत्सव आहे, तो कान फाडणाऱ्या डी.जे.च्या स्पर्धेचा आखाडा होऊ देणार नाही. फलटण तालुक्यातील गणेशोत्सव काळात डी.जे. च्या बेकायदेशीर आणि जीवघेण्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, फलटण तालुका अध्यक्ष वैभव जगताप यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी प्रांताधिकारी फलटण, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन दिले आहे.
वैभव जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की,
“गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील पारंपरिक ढोल-ताशा, लेझीमची जागा आता ५०० ते १००० वॅटच्या भल्या मोठ्या डी.जे. सिस्टीमने घेतली आहे. या डी.जे.चा आवाज १२० ते १३० डेसिबलच्या पुढे असतो, जो थेट मानवी आरोग्यावर हल्ला करतो. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० नुसार दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबलची मर्यादा आहे, रात्री १० नंतर लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदी आहे. मग फलटणमध्ये हा कायदा धाब्यावर का बसवला जातो?”

डी.जे. मुळे सर्वसामान्य ग्राहक, नागरिक त्रस्त -हृदयरोगी, वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला आणि रुग्णांना या कर्कश आवाजामुळे जीवाचा धोका निर्माण होतो,शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रचंड नुकसान होते,गणेशोत्सवाच्या नावाखाली अश्लील गाण्यांवर बीभत्स नृत्य करून सणाचे पावित्र्य नष्ट केले जात आहे, डी.जे. ला जोडलेल्या लेझर लाईटमुळे डोळ्यांना आणि मेंदूला इजा होते.
हा ग्राहकांच्या जगण्याच्या आणि आरोग्याच्या मूलभूत अधिकारावर थेट हल्ला आहे, असे जगताप यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाने ध्वनी प्रदूषण रोखण्यात कुचराई केल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने पुणे पोलीस आयुक्तांविरोधात अवमान याचिका दाखल केलेली होती. त्याची पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यामध्ये होईला नको याची खबरदारी घेण्यात यावी.
फलटण तालुक्यात गणेशोत्सव काळात डी.जे. वर १००% संपूर्ण बंदी जाहीर करा, पारंपरिक ढोल-ताशा वादनालाच केवळ सशर्त परवानगी द्या,नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करून मंडप परवानगी रद्द करा, डी.जे. सिस्टीम जप्त करा,रात्री १० नंतरच्या ध्वनिक्षेपक बंदीची कडक अंमलबजावणी करा.

प्रशासनाने येत्या ४८ तासात यावर ठोस निर्णय घेऊन लेखी आदेश काढला नाही, तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करेल, असा थेट इशारा वैभव जगताप यांनी दिला आहे.
“गणपती बाप्पाला आरती, भजन आणि ढोल-ताशाचा गजर प्रिय आहे, डी.जे.चा धांगडधिंगा नाही. प्रशासनाने मंडळांच्या दहशतीला बळी न पडता सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा विचार करावा. डीजे मुक्त गणेशोत्सव हाच खरा पर्यावरणपूरक आणि भक्तिमय गणेशोत्सव असेल.” – वैभव जगताप, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, फलटण तालुका,या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटणचे अध्यक्ष वैभव जगताप, उपाध्यक्ष अभिजीत भोसले सचिव मारुती मोहिते, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष आप्पासाहेब पिसाळ, जिल्हा सदस्य सदाशिव मोहिते यांच्यासह फलटण तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. प्रशासनाने यावर सकारात्मक कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


