‘ झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश देत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा भव्य वृक्षारोपण उपक्रम

फलटण टुडे वृत्तसेवा ( जाधववाडी/फलटण दि. ३३ जुलै २०२६):- 
वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील चतुर्थ वर्षातील रोपवाटिका (Nursery Management) मॉड्यूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने नक्षत्र गार्डन, फलटणच्या परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
 या अभियानांतर्गत 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देत नक्षत्र गार्डन, फलटणच्या परिसरात २००० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
 यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे. मात्र केवळ झाडे लावणे पुरेसे नसून ती जिवापाड जपणे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आयुष्यात किमान एका झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प केला, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि समृद्ध पर्यावरण निर्माण होऊ शकते.
   या वृक्षारोपण मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक आणि जैवविविधतेस पोषक अशा वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, करंज, आवळा, बोधिवृक्ष, हिरवा चाफा, सोनसावर, नांदरुक, साग, मोहगनी, कापुर वृक्ष, मोहा आदी देशी वृक्षांची निवड करण्यात आली. हे वृक्ष स्थानिक हवामानाशी सहज जुळवून घेतात, अधिक प्रमाणात प्राणवायू उपलब्ध करून देतात तसेच विविध पक्षी व इतर जीवसृष्टीस आश्रय उपलब्ध करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास महत्त्वपूर्ण योगदान देतात.
   या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व प्रा. ए. डी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाला श्री. तुषार नाईक निंबाळकर उपस्थित होते. तसेच श्री. अक्षय सोनवलकर, कृषि सहायक आणि चतुर्थ वर्षातील रोपवाटिका मॉड्यूलच्या विद्यार्थ्यांनी नियोजन, वृक्षलागवड व परिसर सुशोभीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.
  या वृक्षारोपण मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

(शब्द संकलन : प्रा. एस. पी. तरटे, कृषि कीटकशास्त्र विभाग)

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!