बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी— डॉ. अशोक शिंदे

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०८ सप्टेंबर २०२६):-
बदलत्या काळातील माहिती-तंत्रज्ञान, समाजमाध्यमे आणि ज्ञानाच्या विविध उपलब्ध स्रोतांमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीचे आव्हान स्वीकारून शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत करीत विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणारे नव्हे, तर त्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक, समुपदेशक आणि ज्ञानप्रक्रियेचे सुलभक म्हणून सक्षम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय, फलटण मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले.

Screenshot


पाच पांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी येथे जैन सोशल ग्रुप, फलटण आयोजित शिक्षक दिन व क्रांतिवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी पाच पांडव आश्रमशाळेतील सर्व सेवाव्रती शिक्षकांचा डॉ. शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, पाच पांडव आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष महादेव नाळे, सचिव संतोष नाळे, मुख्याध्यापक श्री. शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Screenshot


याप्रसंगी प्रारंभी बोलताना डॉ. शिंदे यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचा सविस्तर आढावा घेतला. ब्रिटिशांच्या अन्यायकारी व जुलमी राजवटीविरुद्ध उमाजी नाईक यांनी उभारलेला संघर्ष, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वातंत्र्याची जाज्वल्य प्रेरणा यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्व त्यांनी सविस्तरपणे अधोरेखित केले. उमाजी नाईक यांचा पराक्रम, त्यांचे शौर्य आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष हा पुढील भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणारा आणि पुढील स्वातंत्र्यचळवळीच्या पायाभरणीतील मूलभूत घटक ठरला, असेही त्यांनी विवेचन केले.


शिक्षक दिनाच्या संदर्भात बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, पूर्वी ज्ञानप्राप्तीची साधने मर्यादित होती; त्यामुळे शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज मात्र इंटरनेट, डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, विविध शैक्षणिक व्यासपीठे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांसमोर माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षकाची भूमिका केवळ पाठ्यक्रम शिकविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज विद्यार्थ्याला माहिती देणारे अनेक स्रोत आहेत; परंतु त्या माहितीचे ज्ञानात, ज्ञानाचे विवेकात आणि विवेकाचे जीवनमूल्यांत रूपांतर करणारा शिक्षक आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच समुपदेशन, मार्गदर्शन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, मूल्यशिक्षण आणि सामाजिक भान यांची जोड देणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांमधून आणि डिजिटल विश्वातून मिळणाऱ्या माहितीची सत्यता तपासणे, योग्य-अयोग्य माहितीतील फरक समजून घेणे आणि तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग करणे याबाबत विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांनी बदलत्या ज्ञानपरंपरेशी स्वतःला जोडून घेत सतत वाचन, अध्ययन, संशोधन आणि तंत्रज्ञानाचे आकलन यांना आपल्या कार्याचा अविभाज्य भाग बनवावे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये प्रश्न विचारण्याची, विचार करण्याची आणि स्वतः ज्ञान शोधण्याची क्षमता विकसित करणे ही आजच्या शिक्षकाची खरी भूमिका आहे, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

Screenshot


काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, ज्ञानाची साधने बदलतात; मात्र विद्यार्थी घडविण्याची शिक्षकाची जबाबदारी अधिक व्यापक होत जाते. शिक्षकाने काळाच्या पुढे चालण्याची तयारी ठेवली, तरच तो विद्यार्थ्यांना भविष्याच्या आव्हानांसाठी सक्षम करू शकतो, असा विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातून दिला. कार्यक्रमात शिक्षकांचा करण्यात आलेला सन्मान हा त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा असून, शिक्षकांच्या कार्याला समाजाने सन्मान पाठबळ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश दोशी यांनी शाळेतील शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना आश्रमशाळेत ज्ञानदानाचे कार्य करण्याची संधी म्हणजे आपणास प्राप्त झालेली सुवर्णसंधी आहे. आपण ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडत आहात म्हणूनच आपण या सन्मानास पात्र आहात अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक व भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. सन्मान समारंभानंतर सन्मानीत शिक्षकांची मनोगते सादर झाली. श्रीपाल जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन चि.श्रेयांश जैन यांनी तर आभार प्रदर्शन सौ. अपर्णा जैन यांनी केले. कार्यक्रमास जैन सोशल ग्रुपचे पदाधिकारी, पाच पांडव आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!