अन्यायकारक संचमान्यता निकष रद्द करण्यासाठी पुण्यात शिक्षकांचे धरणे आंदोलन; ८ ते १० हजार नोकऱ्या धोक्यात

फलटण टुडे वृत्तसेवा ( पुणे , दि ०४ सप्टेंबर २०२६):- उच्च माध्यमिक स्तरावरील प्रस्तावित अन्यायकारक संचमान्यता धोरणाविरोधात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था (कोल्हापूर) आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांच्या वतीने शिक्षण संचालनालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या प्रस्तावित मसुद्यामुळे राज्यातील सुमारे ८ ते १० हजार शिक्षक अतिरिक्त ठरून त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची तसेच अनेक पूर्णवेळ शिक्षक अर्धवेळ होण्याची भीती व्यक्त करत प्रचलित निकषांनुसारच ऑनलाईन संचमान्यता करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

Screenshot

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मसुद्यात तासाचा वेळ ४५ मिनिटांवरून ४० मिनिटे करणे, विज्ञान शाखेच्या एका बॅचची विद्यार्थीसंख्या २० वरून ३० करणे आणि वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांतील कला व वाणिज्य शाखांसाठी १२० विद्यार्थ्यांचा निकष लावणे यांसारखे जाचक नियम प्रस्तावित आहेत. या निकषांमुळे अनेक तुकड्या अनुदानास अपात्र ठरून शिक्षकांची पदे रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विलंब व तांत्रिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांकडे वळत असल्याने कनिष्ठ महाविद्यालयांतील पटसंख्या घटत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला.

Screenshot

शिक्षकांची सेवासुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित धोक्यात आणणारे हे प्रस्तावित निकष तातडीने रद्द करून वस्तुनिष्ठ फेरआढावा घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी शिक्षण संचालकांकडे केली आहे. शासनाने या मागण्यांवर सकारात्मक व तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!