स्लग – शिवनेरी कबड्डी महोत्सव
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई दि १३ ऑक्टोबर २०२६):-
कबड्डीत दुर्मिळ होत चाललेल्या हनुमान उडीने आजचा शिवनेरी कबड्डी स्पर्धा गाजवली. गुरू प्रसाद पंडीतच्या हनुमान उडीच्या चमकदार चढायांनंतरही साऊथ कॅनरा संघाला कुमार गटात पराभवास सामोरे जावे लागले. विजय कल्बने दुसऱ्या फेरीत साऊथ कॅनराचा ४१-२१ असा २० गुणांच्या फरकाने पराभव केला.
दादर येथील भवानी माता क्रीडांगणावर सुरू असलेल्या शिवनेरी सेवा मंडळाच्या ५८ व्या शिवनेरी कबड्डी महोत्सवात दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि भक्कम पकडींच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. कुमार गटात अमर क्रीडा मंडळ, श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळ, नवोदित संघ आणि विजय क्लब यांनी विजय नोंदवला. महिला गटात स्वामी समर्थ महिला संघ आणि जिजामाता संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. निखिल लॉजिस्टिक्सच्या सुरेश भाई कदम यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे.
दरम्यान,व्यावसायिक गटातील दोन्ही सामने अवघ्या एका गुणाच्या फरकाने निकाली निघाल्याने मैदानावर चुरस पाहायला मिळाली.
कुमार गटात अमर क्रीडा मंडळाने गोकुळ क्रीडा मंडळावर ४१ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. अमर क्रीडा मंडळाच्या साहिल बनगर याने चढायांमध्ये प्रभावी खेळ केला, तर शुभम भागवत याने पकडींमध्ये मोलाची भूमिका बजावली. गोकुळ क्रीडा मंडळाच्या श्रेयश थोरात याने चढायांमधून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळाने सिद्धी प्रभा फाउंडेशनवर पाच गुणांनी मात केली. श्रीरामच्या अमित सिंग याने चढायांमध्ये गुणांची कमाई केली, तर हर्ष काळे याने बचावात दमदार पकडी केल्या. सिद्धी प्रभा फाउंडेशनच्या सिद्धेश भोसले याने चढायांतून आव्हान उभे केले, तर दिलीप साईल याने पकडींच्या जोरावर सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न केला.
नवोदित संघाने समर्थ स्पोर्ट्स क्लबवर १६ गुणांनी विजय मिळवला. नवोदित संघाच्या तनीक्ष चव्हाण याने चढायांमध्ये प्रभावी कामगिरी केली, तर विघ्नेश गुरव याने पकडींमध्ये योगदान दिले. समर्थ स्पोर्ट्स क्लबच्या विराज कंडावळे याने चढायांमधून झुंज दिली, तर दर्शन होगडे याने बचावाची बाजू सांभाळली. कुमार गटातील आणखी एका सामन्यात विजय क्लबने साऊथ कॅनरा संघाचा ४१-२१ असा पराभव करत २० गुणांनी दणदणीत विजय मिळवला.

महिला गटात स्वामी समर्थ महिला संघाने आई महाकाली महिला संघावर २७ गुणांनी विजय मिळवला. स्वामी समर्थच्या प्रीती हांडे हिने चढायांमध्ये गुण मिळवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले, तर आर्या रावळ हिने पकडींमध्ये योगदान दिले. आई महाकाली संघाच्या कीर्ती गोपाळे हिने चढायांची जबाबदारी सांभाळत संघाला लढतीत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या सामन्यात जिजामाता संघाने गणेश स्पोर्ट्स क्लबचा ४१-१६ असा पराभव करत २५ गुणांनी विजय नोंदवला. या विजयाने जिजामाता संघाने महिला गटातील आपले वर्चस्व सिद्ध केले.
व्यावसायिक गटात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि गंधेकर इलेक्ट्रिकल यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. विजयी संघाच्या शुभम खारगावकर याने चढायांमध्ये, तर जितेंद्र यादव याने पकडींमध्ये प्रभावी कामगिरी केली. गंधेकर इलेक्ट्रिकलच्या आदित्य घोडेराव याने चढायांमधून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला, तर सौरभ दिवेकर याने बचावात महत्त्वाची भूमिका बजावली.
व्यावसायिक गटातील दुसऱ्या सामन्यात वेस्टजेन ॲकॅडमीने सिद्धी कन्स्ट्रक्शनवर एका गुणाने मात केली. वेस्टजेन ॲकॅडमीच्या निखील पुजारी याने चढायांमध्ये, तर किशोर शिंदे याने पकडींमध्ये योगदान दिले. सिद्धी कन्स्ट्रक्शनच्या फोजन मधू याने चढायांमधून लढत दिली, तर सोहम फुंडे याने पकडींमध्ये शर्थीचे प्रयत्न केले. अखेरच्या टप्प्यात गुणांसाठी झालेल्या चुरशीत वेस्टजेन ॲकॅडमीने बाजी मारली.

संक्षिप्त धावफलक
- अमर क्रीडा मंडळ (४७) विजयी विरुद्ध गोकुळ क्रीडा मंडळ (६)
- श्रीराम विश्वस्त क्रीडा मंडळ (४७) विजयी विरुद्ध सिद्धी प्रभा फाउंडेशन (४२)
- नवोदित संघ (३९) विजयी विरुद्ध समर्थ स्पोर्ट्स क्लब (२३)
- विजय क्लब ४१ विजयी विरुद्ध साऊथ कॅनरा २१.
- स्वामी समर्थ महिला संघ (३४) विजयी विरुद्ध आई महाकाली महिला संघ (०७)
- जिजामाता संघ ४१ विजयी विरुद्ध गणेश स्पोर्ट्स क्लब १६.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विजयी विरुद्ध गंधेकर इलेक्ट्रिकल
- वेस्टजेन ॲकॅडमी विजयी विरुद्ध सिद्धी कन्स्ट्रक्शन
फोटो ओळ
गुरूप्रसाद पंडीतच्या हनुमान उडीने शिवनेरी कबड्डी स्पर्धीतील दुसरा दिवस गाजविला. विजय क्लबविरूद्ध हनुमान ऊडी मारताना साऊथ कॅनराचा गुरूप्रसाद पंडीत.

