फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि १७ सप्टेंबर २०२६) : – सरस्वती माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बिबी येथे १५ व १६ सप्टेंबर रोजी आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या संघाची सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेत मालोजीराजे शेती विद्यालयाच्या खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य बाळकृष्ण काळे, उपप्राचार्य सौ. पूनम कदम, उपमुख्याध्यापक माडकर आणि पर्यवेक्षक सी. टी. कर्वे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच संघाला मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक उत्तमराव घोरपडे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. मान्यवरांनी विजयी संघाला सातारा येथे होणाऱ्या आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे मालोजीराजे शेती विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

