
कोकण-कोल्हापूर विभागीय मंडळाची संवेदनशील ऑनलाईन कार्यशाळा;

पारंपरिक घोकंपट्टीला छेद देत शास्त्रशुद्ध नियोजन, पोषक आहार आणि तणावमुक्तीचा मंत्र
फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर, दि १७ ऑक्टोबर २०२६):-
शालेय जीवनातील सर्वांत नाजूक आणि अत्यंत संवेदनशील टप्पा म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा. ही केवळ पाठ्यपुस्तकांतील माहितीची चाचणी नसते, तर ती एका कोवळ्या वयातील मुलांच्या संयमाची, भावनिक आधाराची आणि आत्मविश्वासाचीही कसोटी असते. मात्र, दुर्दैवाने आपल्या समाजात या परीक्षेचे रूपांतर एका मानसिक युद्धात झाले आहे. परीक्षा जवळ येऊ लागली की घराघरांवर चिंतेचे काळे ढग दाटून येतात. घरातील टीव्हीचे आवाज बंद होतात, मुलांचे मनमोकळे हसू कुठेतरी हरवून जाते आणि प्रत्येक संवादाचा केंद्रबिंदू केवळ ‘टक्केवारी’ आणि ‘गुण’ एवढाच उरतो. शेजारी, नातेवाईक आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे एक प्रचंड, अदृश्य ओझे त्या निष्पाप खांद्यांवर येऊन पडते.
“मी वाचलेले सगळे आठवेल का?”, “ऐनवेळी माझे हात थरथरले तर?”, “माझे गुण कमी आले तर आई-बाबांची मान शरमेने खाली जाईल का?” अशा असंख्य प्रश्नांचे काहूर रोज हजारो विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनात उठत असते. या दबावातून अनेक मुले जेवण सोडतात, रात्रीची झोप गमावून बसतात आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतात. या अत्यंत नाजूक क्षणी मुलांना गरज असते ती कडक शिस्तीची नव्हे, तर मायेच्या स्पर्शाची, समजूतदार संवादाची आणि योग्य मार्गाची. मुलांच्या मनातील हीच घुसमट ओळखून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने थेट संवादाचा एक अत्यंत आश्वासक सेतू बांधला.

गेल्या वर्षापासून सुरू असलेल्या ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग: सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या उपक्रमांतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी थेट ऑनलाईन विशेष मार्गदर्शन सत्र नुकतेच संपन्न झाले. पाचही जिल्ह्यांतील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या सभागृहात व वर्गांत मोठ्या पडद्यावर हे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवले. एकाच वेळी हजारो विद्यार्थी, त्यांचे जागरूक पालक आणि मार्गदर्शक शिक्षक एकत्र बसून या जीवनोपयोगी संवादाचे साक्षीदार झाले.
सत्राचे प्रास्ताविक करताना कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील भीतीवर फुंकर घालत स्पष्ट केले की, बोर्डाची परीक्षा हा कोणत्याही प्रकारचा बागुलबुवा नसून स्वतःमधील सुप्त गुणांना उजाळा देण्याची एक सुवर्णसंधी आहे. केवळ तासनतास डोळे झाकून पुस्तके वाचल्याने गुणवत्ता मिळत नाही, तर त्यासाठी योग्य दिशा, शारीरिक आरोग्य आणि मनाचे संतुलन या तिन्हींची सांगड घालावी लागते. निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वर्षभराचे नियोजन कसे असावे, याचा मार्गदर्शक वस्तुपाठच त्यांनी मांडला. यावेळी कोल्हापूर मंडळाचे सचिव गजानन उकिरडे, कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव, विभागीय क्षेत्रीय अधिकारी आणि पाचही जिल्ह्यांचे मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी ऑनलाईन व्यासपीठावर उपस्थित होते.

अभ्यासाचे सूक्ष्म व्यवस्थापन: घोकंपट्टीपेक्षा दिशा आणि मोजमाप
कराड येथील अनुभवी शिक्षक श्रीराम टेके यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मार्गदर्शक आराखडा अत्यंत नेमक्या आणि व्यावहारिक शब्दांत उलगडून दाखवला. परीक्षेच्या तयारीमध्ये दिशाहीन वाचन टाळून ‘दिशा, शिस्त आणि मोजमाप’ या त्रिसूत्रीचा अंगीकार करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
- विषयांचे तटस्थ वर्गीकरण आणि लहान नोंदवही: विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच स्वतःचे सोपे, मध्यम आणि कठीण विषय ओळखावेत. ज्या विषयात वारंवार कमी गुण मिळतात, त्यांना दैनंदिन अभ्यासात सुरुवातीचा वेळ द्यावा. केवळ डोळ्यांखालून धडे घालवण्यापेक्षा प्रत्येक विषयाची एक छोटी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. यामध्ये महत्त्वाची सूत्रे, व्याख्या, आकृत्या आणि महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवावेत. परीक्षेच्या आदल्या रात्री अवाढव्य पुस्तके चाळण्याने येणारा ताण ही छोटी वही वाचल्याने क्षणात नाहीसा होतो.
- विश्रांतीसह अभ्यासाची सत्रे आणि प्रश्नपत्रिकांचा सराव: मेंदूची ग्रहणक्षमता मर्यादित असल्याने सलग अनेक तास पुस्तकात मान घालून बसणे व्यर्थ ठरते. त्यामुळे पंचेचाळीस मिनिटांचा एकाग्र अभ्यास आणि पंधरा मिनिटांची विश्रांती, अशी सत्रांची आखणी करावी. नोव्हेंबर अखेरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत प्रत्यक्ष घड्याळाच्या वेळेनुसार किमान पाच ते सात जुन्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात. उत्तरपत्रिकेतील अक्षरांचा नीटनेटकेपणा आणि वेळेची मर्यादा सांभाळण्याची कला केवळ सातत्यपूर्ण सरावातूनच जमू शकते.
- पालक आणि विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचा संवाद: घरामध्ये अभ्यासासाठी केवळ शांतताच निर्माण न करता प्रेमळ व आश्वासक वातावरण ठेवावे. पालकांनी दर रविवारी मुलांसोबत वीस मिनिटांचा मोकळा संवाद साधावा. आपल्या पाल्याची तुलना कधीही दुसऱ्या मुलाशी करू नये; कारण प्रत्येक मुलाची जडणघडण आणि क्षमता वेगळी असते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हा सुवर्ण त्रिकोण घट्ट राहिला तर मुलांचे मानसिक खच्चीकरण सहज टाळता येते.
आहार आणि दिनचर्या: निरोगी शरीराविना मेंदू निष्प्रभ
प्रख्यात नेत्रतज्ज्ञ आणि मॅराथॉन धावपटू डॉक्टर राहुल फासे यांनी आहाराचा आणि दिनचर्येचा बुद्धीवर कसा थेट प्रभाव पडतो, हे रंजक आणि शास्त्रीय भाषेत मांडले. शरीर ही एका वाहनासारखी असून तिला जर योग्य इंधन दिले नाही, तर बुद्धी उत्तम काम करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
- मेंदूसाठी पोषक आहार: स्मरणशक्ती आणि एकाग्रता टिकवण्यासाठी दररोज चार ते पाच भिजवलेले बदाम, अक्रोड आणि झटपट ऊर्जा मिळण्यासाठी केळी खावीत. हाडे व स्नायूंच्या मजबुतीसाठी आहारात दूध, दही, ताक, उकडलेले अंडे अथवा दर्जेदार पनीर यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, बीट आणि गाजर यांतून मिळणारे घटक डोळ्यांचे रक्षण करतात आणि शरीरातील लोहाची पातळी संतुलित ठेवतात.
- भ्रमणध्वनीचे संकट आणि डोळ्यांची काळजी: अभ्यासाचा बहाणा करून तासनतास भ्रमणध्वनीच्या पडद्याकडे पाहत राहिल्याने डोळ्यांवर अतोनात ताण येतो. रात्री जेवताना आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी भ्रमणध्वनी पूर्णपणे दूर ठेवावा. अभ्यास करताना दर वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी किमान वीस फूट दूर पाहण्याची सवय ठेवावी, ज्यामुळे डोळ्यांचा थकवा निघून जातो.
- शांत झोप आणि मुबलक पाणी: झोप हे मेंदूची स्मृती साठवून ठेवणारे सर्वांत मोठे नैसर्गिक औषध आहे. रात्री अवाजवी जागरण करून अभ्यास करणे स्वतःची फसवणूक करण्यासारखे आहे. रात्री साडेदहा ते पहाटे साडेपाच ही झोपेची सर्वोत्तम वेळ आहे. दिवसभरात किमान तीन ते साडेतीन लिटर पाणी प्याल्यास शरीरातील मरगळ दूर होते. परीक्षेच्या दिवसांत बाहेरचे तेलकट, मसालेदार अन्न, शीतपेये आणि जड जेवण टाळावे, जेणेकरून पोटाच्या तक्रारी निर्माण होणार नाहीत.
मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन: नकारात्मकतेला हद्दपार करा
सांगली येथील ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर कपिल लळीत यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांची अचूक नस पकडली. त्यांनी विद्यार्थ्यांचे तीन स्वभाव विशद केले. सतत “माझे कसे होणार” म्हणून अतिताण घेणारा ‘मगू’ आणि “अजून खूप वेळ आहे, नंतर करू” असा गाफील राहणारा ‘निकू’ हे दोन्ही स्वभाव अपयशाला आमंत्रण देतात. याउलट दररोज नियमित थोडा थोडा अभ्यास करणारा आणि शिक्षकांची मदत घेणारा ‘अप्पू’ हाच खरा यशाचा मानकरी ठरतो.
- सकारात्मक ताणाची आवश्यकता: मनात कोणताच ताण नसेल तर कृती घडत नाही आणि प्रमाणाबाहेर ताण आला तर हात थरथरणे, पोटात गोळा येणे किंवा घशाला कोरड पडणे असे शारीरिक त्रास सुरू होतात. त्यामुळे अभ्यासाला योग्य दिशा देण्याइतपत थोडा सकारात्मक ताण असणे आवश्यक आहे.
- नकारात्मक विचारांवर फुली: जेव्हा जेव्हा मनात भीतीचे विचार येतील, तेव्हा स्वतःला त्वरित ‘थांबा’ असा इशारा द्यावा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा, मनातील अस्वस्थतेचे शांतपणे निरीक्षण करावे आणि पुन्हा नव्या उत्साहाने प्रत्यक्ष वाचनास लागावे. पंचवीस मिनिटे पूर्ण एकाग्रतेने एका घटकाचा अभ्यास आणि पाच मिनिटांची विश्रांती या साध्या तंत्राने मन कधीही भरकटत नाही.
- उजळणी म्हणजे केवळ घोकंपट्टी नव्हे: वाचलेला भाग बंद करून आठवून पाहणे म्हणजे खरी उजळणी. आपण वाचलेला एखादा नियम घरात आईला किंवा लहान भावाला सोप्या भाषेत समजावून सांगावा. इतरांना समजवता आले की आपला विषय पूर्ण पक्का झाला, हे समजून जावे. मुलांनी कोणाशीही स्पर्धा न करता स्वतःच्या कालच्या प्रगतीशी स्पर्धा करावी.
कार्यक्रमाचा समारोप करताना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी सर्व तज्ञांचे मनःपूर्वक आभार मानले. कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने राबवलेला हा उपक्रम केवळ गुण मिळवण्यासाठी नसून मुलांचे मानसिक आरोग्य सांभाळणारा आणि त्यांना जीवनाच्या लढ्यासाठी सज्ज करणारा आधारवड ठरला आहे, असे त्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले.
या अभ्यासपूर्ण संवादानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भीतीचे सावट पार पुसून गेले होते.

