पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक: मतदान प्रक्रिया उत्साहात संपन्न; निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष

फलटण तालुका शिक्षक मतदारसंघात तब्बल ९१.६८ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद , पदवीधर मतदारसंघात ७०.९५ टक्के मतदान

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २३ ऑक्टोबर २०२६):-
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडली आहे. शिक्षण आणि पदवीधर क्षेत्रातील सुजाण मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतून पार पडलेल्या या निवडणुकीत शिक्षकांच्या मतदारसंघात विक्रमी मतदानाची नोंद झाली असून, दोन्ही मतदारसंघांतील निकालाविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.
या संपूर्ण विभागीय निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांनी अतिशय उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये शिक्षक मतदारसंघात तब्बल ९१.६८ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली असून, पदवीधर मतदारसंघात ७०.९५ टक्के मतदान पार पडले आहे.
फलटण तालुक्यातील शिक्षक मतदार संघातील मतदानाची सविस्तर आकडेवारी पाहता, एकूण ९८६ पैकी ९०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष (५४८ मतदान / ५९५ मतदार) आणि महिला (३५६ मतदान / ३९१ मतदार) मिळून एकूण ९०४ मतदान झाले असून, याची एकूण शेकडोवारी ९१.६८ टक्के इतकी होते.


तसेच पदवीधर मतदार संघात एकूण ४,९०० पैकी ३,४७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष (२,२४७ मतदान / ३,१२९ मतदार) आणि महिला (१,२३० मतदान / १,७७१ मतदार) मिळून एकूण ३,४७७ मतदान झाले असून, याची एकूण शेकडोवारी ७०.९५ टक्के इतकी होते.
निवडणूक आयोगाच्या वतीने पुरेशा सुरक्षा व्यवस्थेत आणि शिस्तबद्ध वातावरणात मतदान केंद्रांमध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेत मतदारांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. फलटणसह संपूर्ण पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघांत झालेल्या या मतदानानंतर आता सर्वपक्षीय नेते, उमेदवार आणि नागरिकांचे लक्ष आगामी मतमोजणी व निकालाकडे लागले असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!