फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २३ ऑक्टोबर २०२६): –
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण येथे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या सांस्कृतिक सोहळ्याचे शुभउद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताराणी कुमार कुचेकर मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात पार पडलेल्या या उत्सवामुळे संपूर्ण शालेय परिसर लोकसंस्कृतीच्या रंगात रंगून गेला होता.

भोंडला हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि परंपरेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पारंपरिक भोंडल्याची विविध गाणी गात आणि फेर धरत आनंद लुटला. टाळ्यांच्या गजर आणि गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे शाळेचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात आले. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लोकसंस्कृतीविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भोंडल्याच्या परंपरेनुसार मुलांना ‘खिरापत’ ओळखण्याचे कोडे घालण्यात आले. मुलांनी आवडीने खिरापत ओळखल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीची खिरापत वाटण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख नियोजन उपक्रम प्रमुख आगवणे मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी केले होते. सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरातील भोंडल्याचा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडला.

