फलटण टुडे वृत्तसेवा ( कोल्हापूर दि २८ ऑक्टोबर २०२६):-
कोल्हापूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटणच्या संघाने अत्यंत चमकदार आणि सरस कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात खेळताना मुधोजी हायस्कूलच्या मुलींनी नाशिक विभागाच्या संघाचा १०-० गोल फरकाने दारुण पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुधोजीच्या खेळाडूंनी आक्रमक आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन घडवले. प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची एकही संधी न देता फलटणच्या संघाने तब्बल १० गोल करत पूर्णपणे सामन्यावर आपले वर्चस्व गाजवले. खेळाडूंच्या या लाजवाब कामगिरीमुळे संपूर्ण क्रीडा वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या ऐतिहासिक विजयासह मुधोजी हायस्कूलच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आणि विजयाबद्दल शाळेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षकवृंद, प्रशिक्षक आणि सर्व स्तरांतून विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले जात असून, आगामी अंतिम सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
मुधोजी हायस्कूलच्या मुलींची राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत ऐतिहासिक मजल; नाशिक विभागाचा १०-० अशा मोठ्या गोल फरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक!
