फलटण टुडे वृत्तसेवा (पुणे दि ३ नोव्हेंबर २०२६):-
मागील तेरा वर्षांपासून सातत्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ‘शिवस्पर्श’ परिवाराच्या वतीने यंदाची दिवाळी पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यातील बोपे, कुंबळे, निगडे खुर्द, वाघमाची आणि चांदवणे या पाच दुर्गम गावांमध्ये हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
आजवर शिवस्पर्शच्या माध्यमातून सुमारे एक हजार विद्यार्थी आणि ५०० कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचे भाग्य या परिवाराला लाभले आहे. यंदा राजगड तालुक्यातील या पाच गावांमध्ये ७५ विद्यार्थी आणि ५० कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शालेय बँग, शालेय साहित्य, वॉटर बॉटल, पणत्या व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच ४० कुटुंबांना किराणा किट आणि ४० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

या दौऱ्यात कुंबळे, बोपे आणि निगडे गावातील गरजू व निराधार महिलांसाठी पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. मांजरी खुर्दचे मा. सरपंच निखिलशेठ उंद्रे, आव्हाळवाडीचे मा. उपसरपंच शरदशेठ आव्हाळे, ग्रामपंचायत सदस्य अभिजीतदादा उंद्रे, सागरशेठ उंद्रे, केसनंदचे जनसेवक श्रीकांतदादा पाटोळे, अजितशेठ बनकर, अजितदादा जाधव तसेच मांजरी खुर्द, आव्हाळवाडी आणि केसनंद येथील इतर दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून या गिरण्या व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबळे येथे ४३ इंची एलसीडी टीव्ही, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निगडे खुर्द येथे एक प्रोजेक्टर आणि दोन व्हाईटबोर्ड भेट देण्यात आले. तसेच या भागातील अंगणवाड्या आणि शाळांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बादल्या, कचऱ्याच्या पेट्या व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोन महिलांना विशेष आर्थिक मदतही सुपूर्द करण्यात आली.

या संपूर्ण उपक्रमात शिवस्पर्श परिवाराच्या सुमारे ५० स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. प्रातिनिधिक स्वरूपात काही कार्यकर्ते उपस्थित असले, तरी या उपक्रमामागे तब्बल दीडशे ते दोनशे व्यक्तींचा आर्थिक व नैतिक आधार लाभला. या सर्व दानशूर व्यक्तींचे आणि शेतकऱ्यांच्या दिवाळीत हातभार लावणारे सर्व सहकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने जयेश सपकाळ यांनी मनःपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोपे येथील शिक्षकांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या वतीने जयेश सपकाळ यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन चिमजी बलकवडे सर यांनी मानले. टीम शिवस्पर्शच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

