श्रद्धा, भक्ती आणि साधनेचा त्रिवेणी संगम; पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत तीर्थयात्रा संपन्न
फलटण टुडे वृत्तसेवा (सांगवी /बासमती दि २३ नोव्हेंबर २०२६):-
श्री दत्त सेवा मंडळ, चांदणी चौक, सांगवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सौराष्ट्र (गुजरात) येथील प्रसिद्ध गिरनार पर्वत परिक्रमा सोळा भाविकांनी अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात यशस्वीरीत्या पूर्ण केली. सुमारे ३८ किलोमीटरची ही खडतर पायी परिक्रमा पूर्ण करताना भाविकांनी निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्मिक अनुभूती घेतली.
श्री दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तीर्थयात्रा म्हणून गिरनार परिक्रमेचे विशेष महत्त्व आहे. गिरनार पर्वताच्या सभोवतालच्या घनदाट जंगलातून ही परिक्रमा केली जाते. भवनाथ पायथ्यापासून सुरू होणारी ही यात्रा दगडधोंडे, डोंगरदऱ्या, मोठमोठी झाडे, वेली आणि खडतर जंगलातील पायवाटा पार करत पूर्ण करावी लागते. वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या या जंगलातून प्रवास करणे हे भाविकांसाठी श्रद्धेची आणि शारीरिक क्षमतेची कसोटी ठरते.

गिरनार परिक्रमेचा मार्ग वर्षातून केवळ पाच दिवस भाविकांसाठी खुला केला जातो. देवउठनी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या यात्रेचे आयोजन केले जाते. त्यानंतर वनविभागाकडून प्रवेशमार्ग बंद करण्यात येतो. या जंगलात सिंह, बिबटे, नीलगायी तसेच विविध वन्यप्राण्यांचा अधिवास आहे.
या परिक्रमेतील जिनाबाबा की मढी, सरनो नदी, मालवेला, सरखडीचा हनुमान, नळपाणी घोडी, सूरजकुंड आणि बोरदेवी या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत भाविकांनी डोंगरातील तीन अवघड चढ-उतार पार केले. अखेर भवनाथ पायथ्याशी परिक्रमेची यशस्वी सांगता झाली.
या तीर्थयात्रेच्या निमित्ताने भाविकांनी गुजरातमधील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेतले. सालंगपूर येथील हनुमान मंदिर व स्वामिनारायण मंदिर, द्वारका येथील श्रीकृष्ण मंदिर, बेट द्वारका, सुदामा-कृष्ण मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सोरटी सोमनाथ, पोरबंदर येथील महात्मा गांधी स्मृतिस्थळ, गिरनार गुरूशिखर, अंबामाता मंदिर, गोरक्षनाथ मंदिर तसेच जुनागड संस्थान परिसराला भेट दिली. परतीच्या प्रवासात त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील धार्मिक स्थळांसह शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन ही यात्रा सुखरूपपणे पूर्ण करण्यात आली.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक पर्यटनापुरते मर्यादित न राहता सहभागी भाविकांनी सामाजिक आणि पर्यावरणविषयक जनजागृतीचा संदेशही दिला. पर्यावरण स्वच्छता अभियान, निसर्गसंवर्धन, भारताची एकता, अध्यात्माची ताकद, योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली.
‘परिक्रमा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि साधना यांचा त्रिवेणी संगम असून, अशा यात्रांमुळे माणसाला आत्मिक समाधानासोबतच निसर्ग, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजते,’ अशी भावना सहभागी भाविकांनी व्यक्त केली.
या तीर्थयात्रेत प्रा. अंकुश शिंदे, प्रा. रवींद्र कोकरे, अतुल तावरे, प्रकाश घाडगे, मारुती तावरे, नितीन तावरे, मिलिंद कदम, संजय थोरात, सोमनाथ कुंभार, रामदास भगत, पोपट शिंदे, रणजित तावरे, शिवमूर्ती लोखंडे, सोपानराव तावरे, काकासो नाळे आणि दीपक कदम यांनी सहभाग घेतला.
श्रद्धा, शिस्त, सहकार्य आणि सामूहिक भावनेच्या बळावर पूर्ण झालेली ही गिरनार परिक्रमा सर्व सहभागी भाविकांसाठी अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व णी ठरली.

