सातारा दि.15 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना 2020-21 शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरणेसाठी ही शेवटची अंतिम संधी देणेत आलेली आहे. यापुढे मुदत देण्यात येणार नसून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी विहित मुदतीमध्ये अर्ज भरण्यासाठी व ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये महाविद्यालयस्तरावरुन सेंट बॅक टू ॲप्लीकंट मध्ये अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी पाठविण्यात आलेले आहेत, त्रुटी पुर्ण कराव्यात. महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज निकाली काढण्याबाबत आवाहनही केले होते. परंतु अद्यापही महाविद्यालयांनी याबाबत कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. सातारा जिल्हयातील महाविद्यालयातील सर्व प्राचार्यानी यात लक्ष घालावे. कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, विद्यावेतन, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांची राहील. जास्तीत जास्त मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्यात यावेत, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.