श्रीनृसिंह चतुर्दशी निमित्त ३ दिवसीय श्रवण महोत्सव इस्कॉन बारामतीत उत्साहात संपन्न

फलटण टुडे वृत्तसेवा बारामती :प्रतिनिधी
श्री नृसिंह चतुर्दशी निमित्त इस्कॉन बारामती येथे आयोजित ३ दिवसीय श्रवण महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात विविध प्रवचने, कीर्तन, लघुनाटिका आणि आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरात दिव्य व प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळाले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी “सर्वत्र परमेश्वराचे दर्शन करून प्रत्येक परिस्थिती स्वीकारणे व निंदा टाळणे हीच खरी साधना आहे” असे सांगितले. श्रवण, कीर्तन आणि स्मरण या भक्तीच्या अंगांनी अर्पित जीवनच उद्धाराचे कारण ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर श्रीमान युवराज हरी प्रभू यांनी नम्रता, निष्कपटता आणि श्रेयत्याग हाच खऱ्या भक्तीचा पाया असल्याचे प्रतिपादन केले. प्रल्हाद महाराजांसारखी द्वेषरहित वृत्ती आणि हरिनामनिष्ठा ठेवल्यास भगवंत स्वतः भक्तीचे रक्षण करतात, असे त्यांनी सांगितले.

दुसऱ्या दिवशी श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी मनुष्य जन्म हा अत्यंत सुदुर्लभ असून तो केवळ इंद्रियसुखासाठी नसून श्रीकृष्णभावना जागृत करून भगवद्भक्तीत अर्पण करण्यासाठी आहे, असे मार्गदर्शन केले. प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणातून त्यांनी समर्पण, द्वेषरहित वृत्ती आणि हरिनामाधारित जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.

तिसऱ्या दिवशी श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी श्री नृसिंह भगवंतांच्या चरणी नम्रता, शरणागती आणि संरक्षणभाव ठेवून प्रार्थना करण्याचे महत्त्व सांगितले. “हे प्रभो, माझ्या अंतःकरणातील भय, अहंकार आणि अनर्थ दूर करा,” अशी प्रार्थना करत हरिनाम जपल्यास भक्ती अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.

या महोत्सवात “लौल्यम एकमेव मूल्य” या भावनेवर आधारित भक्तवत्सल भगवान श्रीनृसिंह यांच्या प्राकट्याची प्रभावी लघुनाटिका सादर करण्यात आली. भक्ताच्या निष्कपट व तळमळीच्या हाकेला भगवंत कसे प्रतिसाद देतात, हा संदेश या नाटिकेतून हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला.

यावेळी इस्कॉन मायापूर चंद्रोदय मंदिराच्या प्रेरणेने साकारलेल्या विशेष सजावटीत श्री नृसिंहदेवांचे मायापूर स्वरूप दर्शनास ठेवण्यात आले होते. तसेच श्री श्री राधा गोविंदजींसाठी सुगंधित फुलांचा आकर्षक ‘फुल बंगला’ उभारण्यात आला होता, ज्यामुळे मंदिर परिसर अधिकच मनोहारी झाला.
उत्सवानिमित्त श्री नृसिंह भगवंतांचा पुष्पाभिषेक, महाआरती, हरिनाम कीर्तन आणि महाप्रसाद वितरण यांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घेतला.
संपूर्ण महोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती इस्कॉन मंदिर व्यवस्थापक श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांनी दिली. हरे कृष्ण

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!