फलटणचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ लिखीत ग्रंथाला आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा मानाचा पुरस्कार27 जून रोजी विश्‍वास पाटील यांच्या हस्ते होणार गौरव

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि २१ जून २०२६):-

इचलकरंजी येथील ऐतिहासिक व शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ’आपटे वाचन मंदिर’ (शासनमान्य ’अ’ वर्ग तालुका वाचनालय) आणि ’इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे सन 2025 या वर्षातील अत्यंत प्रतिष्ठेचे ’उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांनी लेखन व संपादन केलेल्या ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर – कर्तृत्वाचा एक शोध’ (खंड 1 ते 3) या त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथाला ’लक्षणीय गद्य साहित्यकृती’साठीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या गौरवपूर्ण निवडीमुळे फलटणच्या पत्रकारिता आणि साहित्य वर्तुळातून बेडकिहाळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हा त्रिखंडात्मक चरित्र ग्रंथ महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’ या संस्थेने प्रकाशित केला आहे. लेखक रवींद्र बेडकिहाळ यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या बहुआयामी जीवनावर प्रदीर्घ व सखोल संशोधन करून हा ऐतिहासिक ग्रंथप्रपंच साकारला आहे. आद्य पत्रकारांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आणि ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक, यासोबतच त्यांनी इतिहास, शिक्षण, गणित आणि वैज्ञानिक संशोधन अशा विविध क्षेत्रांत केलेले उत्तुंग कार्य या ग्रंथात विस्तृतपणे मांडले आहे. मराठी पत्रकारांसाठी, अभ्यासकांसाठी आणि संशोधकांसाठी हा ग्रंथ एक अनमोल मार्गदर्शक ठेवा मानला जात आहे.

दिग्गजांची उपस्थिती आणि भव्य वितरण सोहळा
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक 27 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता आपटे वाचन मंदिर, बजाज सभागृह, राजवाडा चौक, इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे. या समारंभासाठी सातारा येथे झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. विश्‍वास पाटील (प्रसिद्ध आयएएस अधिकारी व कादंबरीकार) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी वस्त्रोद्योग मंत्री (महाराष्ट्र शासन) श्री. प्रकाशआण्णा आवाडे भूषविणार असून, ग्रंथालयाचे मार्गदर्शक डॉ. श्री. अशोकराव सौंदत्तीकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ. सुषमा दातार, स्मृती ट्रस्टचे सचिव डॉ. श्रीवल्लभ मर्दा आणि कार्यवाह प्रा. मोहन पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यरत आहेत.

इतर प्रमुख पुरस्कार
विजेते (वर्ष 2025):
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह: जुई कुलकर्णी, पुणे (पुस्तक: ’तुझ्याकडे येण्याच्या कविता’)
उत्कृष्ट गद्य साहित्यकृती: संतोष नागो शिंदे, पुणे (पुस्तक: ’पटयारा’)
लक्षणीय पद्य साहित्यकृती: जितेंद्र कुवर, नाशिक (पुस्तक: ’झाडाची कविता’) व अरविंदा भामरे, धुळे (पुस्तक: ’शापित कोलाहलाच्या नोंदी’)
लक्षणीय गद्य साहित्यकृती: रवींद्र बेडकिहाळ, फलटण (‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर:कर्तृत्त्वाचा एक शोध’) व डॉ. सिसिलिया कार्व्हलो, वसई (पुस्तक: ’प्रसादचिन्हे’)
सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह: क्षितिज देसाई, ठाणे (पुस्तक: ’शीतपेटीतून जेव्हा जाग येते…’)
विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी: अभय इनामदार, पुणे (पुस्तक: ’भूछत्र’)
महादेव बाळकृष्ण जाधव उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती: पद्मजा मेहेंदळे, पुणे (पुस्तक: ’सोबत सांजवेळची’)
वसुंधरा मुकुंद अर्जुनवाडकर उत्कृष्ट ललित गद्य: नरेंद्र पाठक, ठाणे (पुस्तक: ’वानोळा’)
पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती: मालविका देखणे, नागपूर (पुस्तक: ’मायरा आणि देवराईचे गुपित’ भाग 1 व 2)
रागिणी दादासाहेब जगदाळे स्मृत्यर्थ युवा पद्मरत्न पुरस्कार: नयन पहाड, अमरावती (पुस्तक: ’जिवी जे गुंतले’)
मुकुंद कुलकर्णी स्मृत्यर्थ उत्कृष्ट स्थानिक परिसर साहित्य पुरस्कार: बापू तारदाळकर, इचलकरंजी.
उत्कृष्ट वाचक पुरस्कार: सुनील श्रेष्ठी, इचलकरंजी.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!