फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण, दि. १९ जुलै २०२६) : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे इयत्ता ११ वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे होते तर उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर बी निंबाळकर ,ज्येष्ठ प्रा अभिजीत माळवदे, प्रा सौ वनिता लोणकर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्राचार्यांचे स्वागत उपप्राचार्य सोमनाथ माने यांनी गुलाबपुष्प देऊन केले.

यावेळी नवागत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशालेचे प्राचार्य वसंत शेडगे म्हणाले की, “इयत्ता ११ वी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा शैक्षणिक टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, मेहनत आणि उत्तम संस्कार यांची सांगड घालून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. दृढ संकल्प, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर जीवनात यशाचे शिखर गाठता येते. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे.”

या प्रसंगी प्रशालेत नव्याने प्रवेश केलेल्या नवागत विद्यार्थ्यांतील काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य सोमनाथ माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शालेय शिस्त, अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. इयत्ता ११ वी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रा सौ विनिता लोणकर,प्रा सागर बोराटे, प्रा मनोज ढावरे,प्रा प्रितम लोंढे आणि प्रा निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी शिक्षणाबरोबरच शिस्त, सातत्य, सकारात्मक विचारसरणी आणि उत्तम संस्कार यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नव्या शैक्षणिक टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपली ध्येये निश्चित करून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वागत समारंभ यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ धनश्री नाईक निंबाळकर यांनी केले, प्रास्ताविक श्रीमती मेटकरी यांनी तर प्रा सुधाकर वाकुडकर यांनी आभार मानले.

