शासकीय कागदपत्रांवरून स्पष्ट: हे काम ‘रामराजे नाईक निंबाळकर’ यांच्याच पाठपुराव्यामुळेच; तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती निधीची मागणी*
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ३१ जुलै २०२६):-
फलटण पंचायत समितीच्या सभापती निवासस्थानाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्या होत आहे. मात्र, या इमारतीचे काम आपल्यामुळेच झाल्याचा दावा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करत असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, उपलब्ध शासकीय कागदपत्रे, शासन निर्णय आणि पुरातत्व विभागाच्या परवानग्यांवरून हे काम प्रत्यक्षात विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याच सततच्या पाठपुराव्यामुळे सिद्ध झाल्याचे स्पष्ट होत आहे.
कागदपत्रांमधील महत्त्वाचे पुरावे व पुरातत्व खात्याची परवानगी:
१३ मार्च २०२० रोजीचे पत्र: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती असताना तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून फलटण पंचायत समितीचे सभापती व कर्मचारी निवासस्थान धोकादायक झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यासाठी व परिसराच्या सुशोभिकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रामराजेंनी केली होती.
जिल्हा परिषदेचा ३.१२ कोटींचा प्रस्ताव: रामराजेंच्या पत्रव्यवहारानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १९ मार्च २०२१ रोजी ३ कोटी १२ लाख ३१ हजार ९०० रुपयांचे ढोबळ अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवले. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्राचा स्पष्ट संदर्भ देण्यात आला होता.
शासकीय प्रशासकीय मान्यता (४ जानेवारी २०२३): ग्रामविकास विभागाने ४ जानेवारी २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार (क्रमांक: पंसई-२०२०/प्र.क्र.११६/बांध-४) या निवासस्थान बांधकामासाठी २ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली.
पुरातत्व विभागाची महत्त्वाची परवानगी: या कामासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, सदर इमारतीचे बांधकाम ऐतिहासिक ‘जबरेश्वर मंदिर’ या पुरातन वास्तूच्या २०० मीटर परिघामध्ये (Restricted Zone) येत होते. त्यामुळे बांधकामासाठी केंद्रीय पुरातत्व खात्याची (ASI) परवानगी मिळवणे अत्यंत क्लिष्ट होते. यावर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट दिल्लीतील केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याशी सातत्याने संपर्क साधून, आवश्यक त्या सर्व कायदेशीर परवानग्या मिळवून हे काम प्रत्यक्षात मार्गी लावले.
“शासकीय नियमांची पायमल्ली; हे केवळ फुकटचे श्रेय”:
उद्या होणाऱ्या या इमारतीच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. हे उद्घाटन कोणत्याही अधिकृत शासकीय नियमांचे पालन न करता, कोणतीही शासकीय आमंत्रण पत्रिका न छापता घाईघाईत उरकले जात आहे.
याबाबत बोलताना श्रीमंत रामराजे यांच्या समर्थकांच्या वतीने तीव्र शब्दांत घणाघात करण्यात आला आहे.
“शासकीय नियमांची पायमल्ली करून होणारा हा सोहळा म्हणजे ‘दुसऱ्याच्या कामाचे फुकट श्रेय लाटण्याचा’ प्रकार आहे,”
अशी जोरदार टीका श्रीमंत रामराजे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
श्रेय लाटण्याचा प्रयत्न?
२०२० मधील रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पहिल्या पत्रापासून, केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या परवानग्या मिळवण्यापर्यंत आणि २०२३ मधील प्रशासकीय मान्यतेपर्यंत सर्व कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया रामराजेंनीच पूर्ण केल्याचे स्पष्ट दिसत असताना, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे “काम रामराजेंचे आणि श्रेय भलत्याचेच” अशीच चर्चा आता फलटण तालुक्यात रंगू लागली आहे.

