फलटण शहरात रोड रोमिओंचा उच्छाद; शाळा-कॉलेज परिसरात फेऱ्यांवर फेऱ्या विद्यार्थिनींना नाहक त्रास, कारवाईची मागणी….

फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १० ऑगस्ट २०२६):-
फलटण शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात काही रोड रोमिओंकडून वारंवार फेऱ्या मारण्याचे प्रकार सुरू असल्याने विद्यार्थिनींसह पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शाळा-कॉलेज सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत काही तरुण दुचाकींवरून परिसरात घिरट्या घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विनाकारण थांबणे, मोठ्या आवाजात दुचाकी चालवणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे तसेच टोळक्याने उभे राहून हुल्लडबाजी करणे अशा प्रकारांमुळे विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.


या प्रकारांमुळे पालकांमध्येही नाराजी असून, शाळा-कॉलेज परिसरात पोलिसांची नियमित गस्त वाढवावी आणि रोड रोमिओंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकारांकडे पोलिस प्रशासनाचे पुरेसे लक्ष आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्याआधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


फलटण शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती, सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर आणि नियमित पेट्रोलिंग वाढविल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो.
विद्यार्थिनींची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय असून, संबंधित रोड रोमिओंवर तातडीने कारवाई करून पालक व विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!