फलटण तालुक्यातील वाहनांसाठी ६० किमी परिघात ५०० ते ६०० रुपयांत वार्षिक टोल पास द्या; ॲड. कांचनकन्होजा खरात यांची मागणी

फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ९ सप्टेंबर २०२६): – फलटण तालुक्यातील सर्व वाहनांना एस.टी. स्टँडपासून ६० किलोमीटर परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
फलटण हे सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी, कृषी व औद्योगिक केंद्र आहे. सध्या फलटण-पंढरपूर, फलटण-पुणे/जेजुरी, फलटण-इंदापूर/बारामती, फलटण-दहिवडी आणि फलटण-लोणंद-शिरवळ या सर्व दिशांनी राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळे विकसित होत आहे. रस्त्यांच्या बांधकामादरम्यान स्थानिक नागरिकांना धूळ, अपघात, अपंगत्व आणि वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. आता हे रस्ते पूर्णत्वाकडे जात असताना नागरिकांवर प्रत्येक दिशेने प्रवास करताना टोलचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

Screenshot


सध्या टोल प्लाझापासून २० किलोमीटर अंतरासाठी स्थानिक पासाची तरतूद आहे, परंतु विस्तृत फलटण तालुक्यासाठी ही मर्यादा अपुरी पडते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः नोकरदार, व्यावसायिक व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.


प्रमुख मागण्या:
६० किमी परिघीय पास: फलटण एस.टी. स्टँड मध्यबिंदू मानून ६० किमी परिघातील सर्व विद्यमान व भविष्यातील टोल प्लाझांसाठी ‘फलटण तालुका स्थानिक वार्षिक एकत्रित टोल पास’ सुरू करावा.
वाहनांचा भेद नको: ट्रान्सपोर्ट (TR) आणि नॉन-ट्रान्सपोर्ट (NT) असा भेदभाव न करता तालुक्यातील सर्व वाहनांना ही सवलत लागू करावी.
परवडणारा दर: या विशेष पासची वार्षिक फी सामान्य नागरिकांना परवडणारी, म्हणजेच ५०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान असावी.
डिजिटल जोडणी: एकाच फास्टटॅग किंवा डिजिटल प्रणालीद्वारे ६० किमी परिघातील सर्व टोल प्लाझांवर ही सवलत आपोआप लागू व्हावी.
राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाचा सर्वाधिक आर्थिक भार सहन करणाऱ्या स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने हा धोरणात्मक निर्णय तातडीने घ्यावा, तसेच स्थानिक खासदार व आमदारांनी हा प्रश्न संसद आणि विधानसभेत प्रभावीपणे मांडावा, असे आवाहनही ॲड. कांचनकन्होजा खरात यांनी केले आहे.

Screenshot
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!