फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि ११ सप्टेंबर २०२६):-
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळांतर्गत ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रशालेतील विविध विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकूण सहा शिक्षकांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक-
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी उच्च माध्यमिक विभागातून मनोज ढावरे व सौ. कविता सावंत, दुपार विभागातून दिलीप जाधव व सौ. सुरेखा गावडे, तर सकाळ विभागातून बापूराव सूर्यवंशी व सौ. लतिका अनपट यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य वसंत शेडगे म्हणाले की, गुणवंत शिक्षकांचा गौरव केल्याने त्यांच्या कामाला पोचपावती तर मिळतेच, शिवाय इतर शिक्षकांनाही अधिक प्रभावी व समर्पित वृत्तीने काम करण्याची नवी ऊर्जा मिळते. शिक्षकांनी ज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा आणि गुणवत्तेचा हा आलेख असाच उंचावत ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य ए. वाय. ननावरे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने, पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर, विजय पाटील व पर्यवेक्षिका सौ. पूजा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


